राज्याचे शिक्षण संचालक सर्जेराव जाधव यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा व आढावा बैठक २८-२९ एप्रिल रोजी पन्हाळा येथे बोलावली आहे. सामान्यत: पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी होणारी ही बैठक अचानक पन्हाळय़ाला कशी, असा प्रश्न काही जणांना पडेल. त्याचे उत्तर एका योगायोगामध्ये दडले आहे. जाधव यांच्या मुलाचे लग्न बैठकीच्या पुढच्या दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी कोल्हापूर येथे होणार आहे.. इतका चांगला योग जुळून आलेला असताना काही ‘विघ्नसंतोषी’ अधिकारी मात्र नाराज आहेत. ‘लग्नाला सरकारी खर्चाने वऱ्हाडी जमावेत म्हणूनच साहेबांनी बैठक पन्हाळा येथे घेतल्याची’ चर्चा त्यांच्यात सुरू आहे.
सर्जेराव जाधव हे राज्याचे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) आहेत. त्यांनी २८ व २९ एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्ह्य़ातील पन्हाळा येथील संजीवनी विद्यालयात एक आढावा बैठक बोलावली आहे. त्याला राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (दक्षिण, उत्तर, पश्चिम) यांना हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. याबाबतचे पत्र १० एप्रिल रोजी संबंधितांना पाठवण्यात आले आहे. संबंधित सर्व अधिकारी २७ तारखेला मुक्कामी पन्हाळ्याला पोहोचतील आणि पुढे दोन दिवसांची कार्यशाळेला हजर उपस्थित राहतील. या कार्यशाळेत गटागटाने सादरीकरण व चर्चा होणार आहेत. तेथेच राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कार्यशाळा संपल्यानंतर पुढच्याच दिवशी म्हणजे ३० तारखेला जाधव यांच्या मुलाचे लग्न कोल्हापूर येथे आहे. या योगायोगाबाबत काही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. ‘अशा बैठका सामान्यत: पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी होतात. मात्र, अधिकाऱ्यांना सरकारी खर्चाने लग्नाला येता यावे यासाठीच पन्हाळा येथील कार्यशाळेचा घाट घातला आहे,’ असा आरोप त्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर केला.

कार्यशाळा हा कार्यालयीन कामाचा भाग आहे, तर लग्न ही वैयक्तिक बाब आहे. शिक्षणाधिकाऱ्यांची मागणी असल्यामुळे ही कार्यशाळा होणार आहे. २९ तारखेला दुपारी बैठकीचा समारोप झाल्यावर ज्यांना जायचे आहे ते लोक आपापल्या गावी जाऊ शकतात. पन्हाळा येथील शाळेत निवासाची, जेवणाची सोय होऊ शकेल म्हणून तेथे कार्यशाळा घेण्यात आली आहे.     – सर्जेराव जाधव, शिक्षण संचालक

 
अभिजित घोरपडे, पुणे</strong>