गोविंदराव तळवलकर यांच्या निधनाचे वृत्त बुधवारी सकाळी आल्यानंतर साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील मराठवाडय़ातल्या त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. तळवलकर महाराष्ट्र टाइम्स चे दीर्घकाळ संपादक होते. या काळात त्यांचा मराठवाडय़ाशी, विशेषत: औरंगाबादशी खूप निकटचा संबंध आला. त्यातून निर्माण झालेले ऋणानुबंध त्यांनी दीर्घकाळ जपले.

१९८० च्या दशकात ते असेच एकदा औरंगाबादेत आले असता काही तरुण वाचक व चाहते त्यांना हॉटेलमध्ये भेटले, अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर त्यातील एकाने त्यांना तुमचा पुढचा कार्यRम काय, असे सहजपणे विचारले. त्यावर ‘औरंगाबादेत आल्यावर अनंतराव भालेरावांना भेटणे हा एकच कार्यRम’ असे उत्तर तळवलकरांनी दिले होते. पूर्वी पत्रकारितेत असलेले आणि आता माहिती खात्यात उपसंचालकपदी काम करणारे राधाकृष्ण मुळी यांनी तळवलकरांची वरील आठवण नमूद केली.

तळवलकरांना मराठवाडय़ाबद्दल आणि या भागातील प्रश्नाांबद्दल आस्था होती. मराठवाडय़ाच्या साहित्य-पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि आहे. यातील अनेकांना तळवलकरांच्या तीस-चाळीस वर्षांंपूर्वीच्या अग्रलेखांचे विषय, त्यावेळचे संदर्भ आणि मथळे आजही लक्षात आहेत. स्वत: मुळी यांनाही अनेक मथळे तोंडपाठ आहेत.

तळवलकर वेळोवेळी औरंगाबादी आले; पण समारंभ-व्यासपीठांवर हजेरी लावण्याऐवजी चर्चा-संवाद, भेटीगाठी यांतून त्यांनी अनेक विषय समजून घेतले. जाहीर कार्यRमांपासून सदैव दूर राहणारे तळवलकर अनंतराव भालेराव यांच्या नागरी सत्काराच्या सोहळ्याला मात्र आवर्जुन उपस्थित राहिले. अनंतरावांच्या ध्येयवादी पत्रकारितेची, त्यांच्या त्यागी व तपस्वी वृत्तीची त्यांनी मोजक्याच पण नेमक्या शब्दांत प्रशंसा केली. पुढे अनंतरावांच्या निधनानंतर त्यांनी म.टा.त लिहिलेला ‘तेजस्वी व सेवाभावी’ हा मृत्यूलेख आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्याआधी थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांचे १९८२ मध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर ‘विद्वान समीक्षक हरपला’ या मृत्युलेखातून तळवलकर यांनी कुरुंदकरांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवले होते.

मराठवाडय़ात विद्यापीठ नामांतर चळवळ जोमात असताना गोविंदभाई, अनंत भालेराव, कुरुंदकर आदी मंडळी नामांतराच्या विरोधात होती. याकाळात अनंतराव व त्यांच्या प्रभावळीवर नामांतरवाद्यांकडून नेहमी जहरी टीका केली जात असे. तळवलकर हे दररोज अन्य दैनिकांबरोबरच ‘मराठवाडा’ ही आवर्जून वाचत. नामांतराविषयी दोन्ही गटांच्या बाजू समजून घेतल्यानंतर तळवलकरांनी मटाच्या संपादकीय पानावर अनंत भालेराव यांचा या संवेदनशील विषयावरील सविस्तर लेख प्रसिद्ध केलाच, शिवाय ‘भालेरावांची भूमिका’ हा अग्रलेखही तेव्हा लिहिला होता.

भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी देण्यात येणाऱ्यास पुरस्कारास आता २५ वर्षे झाली आहेत. या मालिकेतील पहिला पुरस्कार १९९२ साली गोविंदरावांना जाहीर झाला होता. तो त्यांनी स्वीकारला. अनंतरावांच्या निधनानंतर पुढे काही वर्षांनी तळवलकर म.टा.च्या संपादकपदावरुन निवृत्त झाले. त्यानंतर मात्र त्यांचा औरंगाबाद आणि ‘मराठवाडा’शी निर्माण झालेला संपर्क खंडित झाला.

मराठवाडय़ात १९८०-९० या दशकातील तरुण पिढीवर तळवलकरांच्या लेखनाचा, त्यांच्या सडेतोड अग्रलेखांचा, त्यांच्या भाषाशैलीचा विलक्षण प्रभाव पडला. आमच्या जडणघडणीत तळवलकर, भालेराव यांच्या लेखनाचा, त्यांच्या विचारांचा फार महत्त्वाचा वाटा आहे, असे याच पिढीतील सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी सांगितले.

‘मराठवाडा’सारख्या प्रादेशिक वृत्तपत्रातील अग्रलेख किंवा महत्त्वाच्या लेख म.टा.त पुन: प्रकाशित करण्याची प्रथा तळलकरांनी रुढ केली. यामागची त्यांची दृष्टी आणि सामाजिक भान महत्त्वाचे होते, असे मोपलवार यांनी नमूद केले. तळवलकरांच्या गाजलेल्या अग्रलेखांचा स्वतंत्र संग्रह आहेच;पण त्यांनी प्रदीर्घ संपादकीय कारकिर्दीत लिहिलेल्या मृत्यूलेखांचे दोन भाग (पुष्पांजली) प्रकाशित झाले असून नव्या पिढीतील पत्रकारांनी ते अवश्य वाचावेत, असे अन्य एक सनदी अधिकारी किरण कुरुंदकर यांनी म्हटले आहे.

पत्रकारितेतील प्रदीर्घ कारकीर्दीत तळवलकर नांदेडला कधीच आले नाहीत. शेजारच्या लातूर जिल्ह्य़ात ते एका पुरस्कार समारंभासाठी आले होते. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या काही निर्णय व धोरणांवर तळवलकरांनी केलेली टीका नांदेडमधील त्यांच्या वाचकांच्या आजही स्मरणात आहे. शंकररावांचे राजकारणातील समर्थक  रत्नप्पा कुंभार यांच्यावर एक टीकात्मक अग्रलेख लिहितांना तळवलकरांनी त्याला दिलेला ‘दे.भ.की, दे.भो.’ हा मथळा लक्षणीय ठरला होता.

‘पवारांचा रमणा’, ‘समाजवादी लक्षभोजन’, ‘कृष्णाकाठचे तर्पण’, ‘सचिवालयातील मेहूण’, ‘शब्द बापुडे केवळ वारा’अशा त्यांच्या अनेक गाजलेल्या मथळ्यांची वाचकांना बुधवारी आठवण झाली. १९८४- ८५ दरम्यानच्या मराठवाडय़ातील एका साहित्यिक वादात ‘सोबत’कार ग.वा.बेहरे यांनी तळवलकर, अनंतराव प्रभृतींवर अत्यंत विखारी, बोचरी टीका केली होती. त्या वादाचा शेवट बेहरेंनी ज्यांचा पुरस्कार केला होता, त्यांच्या दारुण पराभवाने झाला. त्यानंतरच्या अग्रलेखात तळवलकर सहजपणे लिहून गेले की; ‘बेहरेंच्या टीकेला उत्तर देणे आम्ही आमचा कमीपणा समजतो, पण जो बेहरेंवर विसंबला;त्याचा कार्यभाग बुडाला.’