सोनई (नेवासे) येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदा कृतज्ञता पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. यंदा पहिल्याच वर्षी ज्येष्ठ हिंदी कवी, गीतकार, दिग्दर्शक पटकथा-संवाद लेखक गुलजार, प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि अपंग पुनर्वसन कार्यातील ज्येष्ठ समाजसेविका नसीमा हुरजूक यांना हा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याच्या प्रति कतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी दिली.
येत्या प्रजासत्ताकदिनी (दि. २६) दुपारी ४ वाजता सोनई येथील मुळा पब्लिक स्कुलच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते या पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. १ लाख रूपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गुलजार, विज्ञान व संशोधनासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर आणि अपंगाच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या नसीम हुजरूक यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
प्रशांत गडाख यांनी सांगितले की, यंदा साहित्य, विज्ञान व सामाजिक क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांप्रति संस्था ही कृतज्ञता व्यक्त करणार आहे. समाजकारणी, शास्त्रज्ञ, लेखक व कलावंत अशा प्रतिभावान लोकांच्या योगदानातून समाज प्रगतीपथावर जातो. समाजावरील त्यांच्या या ऋणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून तरूण पिढीला त्यातून प्रेरणा मिळावी या हेतून संस्थेने ही उपक्रम सुरू केला आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्रदान, गरीब व निराधार मुलींचे पालकत्व, वृक्षारोपण, ग्रामदत्तक योजना, महिला बचतगट सक्षमीकरण, समाजिक एकोपा यासारखे उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. या वर्षीपासुन कृतज्ञता सोहळयाचा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे. कृतज्ञता सोहळ्यास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांनी केले आहे.