म्होरक्यांना ठार मारण्याची धमकी
तेंदू, रस्ते, बांधकाम कंत्राटदार तसेच व्यापाऱ्यांकडून जमा केलेली लाखोंची खंडणी नक्षलवाद्यांनी गडचिरोलीच्या जंगलात लपवून ठेवली आहे. मात्र, या धनाचा शोध घेण्यासाठी गुप्तधन शोधणाऱ्या टोळय़ा जंगलात सक्रिय झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी या टोळीच्या म्होरक्यांना धमकावले असून, जंगलात आलात तर ठार मारू, अशी धमकी दिली आहे.
नक्षलवाद्यांनी गडचिरोलीत वन विभाग, ग्राम पंचायत कार्यालयाची जाळपोळ करून हिंसाचार सुरू केला आहे. अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील वनपरिक्षेत्र कार्यालय जाळपोळीच्या घटनेच्या आधी एका गावात विविध नक्षल दलम प्रमुखांच्या उपस्थितीत नक्षल चळवळीबाबत झालेल्या बैठकीत गुप्तधन, अवैध दारू आणि हिंसक कारवायांमध्ये वाढ करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या एटापल्ली, अहेरी, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून गुप्तधन शोधणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्या आहेत. काळी मांजर, घुबड, पायाळू व्यक्तींच्या मदतीने जंगलात गुप्तधन शोधण्यासाठी भटकंती सुरू आहे. यामध्ये आंध्रप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाण व महाराष्ट्रातील मांत्रिकांची मदत घेतली जात आहे. स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून टोळीचे म्होरके संशयित ठिकाणी पूजाअर्चा करून खोदकामही करीत असल्याचे दिसून येते. यात बेरोजगार तरुण व काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तेंदूपत्ता कंत्राटदार, रस्ते कंत्राटदार, बांबू, इमारत बांधकाम व्यावसायिकांकडून घेतलेल्या लाखोंच्या खंडणीची रक्कम नक्षल दलम प्रमुखांनी अनेक ठिकाणी घनदाट जंगलात दडवून ठेवली आहे. गेल्या वर्षभरात अनेक दलम प्रमुख चकमकीत ठार झाले. काहींनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षल प्रमुखांनी लपवून ठेवलेली ही रक्कम अजूनही जंगलातच आहे. ते शोधण्यासाठी काही म्होरक्यांनी तर नक्षल्यांच्या नातेवाईकांना हाताशी धरले.यामुळे नक्षलवादी नेते संतापले असून, म्होरक्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

नक्षलवाद्यांचा पैसा जंगलातच
या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, नक्षलवाद्यांचा सर्व पैसा हा जंगलातच असतो, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, सर्वसामान्य माणून जंगलात जावून नक्षलवाद्यांचा पैसा शोधण्याची हिंमत करणार नाही. काही घटनांमध्ये तशी वस्तुस्थिती असू शकते, असे पाटील म्हणाले.