हिंगोलीचे जिल्हा पुरवठा अधिकारी अभिमन्यू बोधवड यांचे निलंबन मागे घ्यावे, तसेच १५६ (३) अन्वये पोलिसांत दाखल होणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्ह्य़ांमध्ये त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घेण्याची सूचना गृह विभागाला द्यावी, या मागणीसाठी मराठवाडय़ातील उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन केले. मराठवाडय़ातील ५९२ अधिकारी रजेवर गेल्याने महसूल प्रशासन ठप्पच राहिले.
हिंगोली जिल्ह्य़ातील औंढा नागनाथ येथे बोधवड यांच्यावर गढाळा येथील प्रकरणात १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल झाला. त्यांनी या विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाकरणाकडे (मॅट) अपील केले होते. त्यांचे निलंबन बुधवारी रात्री मागे घेण्यात आल्याचेही वृत्त आहे. मात्र, ज्या पद्धतीने १५६ (३)चा गैरवापर होतो आहे, तो लक्षात आणून देता यावा म्हणून मराठवाडय़ातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन केले.
या प्रकरणात बोधवड यांना आकसापोटी अटक करणारे पोलीस उपनिरीक्षक सय्यद यांना ताकाळ निलंबित करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. ९६ उपजिल्हाधिकारी, ११३ तहसीलदार, ३७४ नायब तहसीलदार व ९ अतिरिक्त जिल्हाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे तक्रार देण्यासाठी आलेल्या अनेकांची अडचण झाली. ‘आज साहेब नाहीत, उद्या या’ असे कर्मचारी तक्रारकर्त्यांना सांगत होते.