पक्षातील अंतर्गत ‘काडय़ा’ लावण्याचे धंदे बंद करा. जुना-नवा असा कार्यकर्त्यांतील वादही आता बंद करा. कुरघोडय़ा करणा-यांना खडय़ासारखे बाजूला करा, अशा कानपिचक्या देत पालकमंत्री राम शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
भाजपच्या प्रदेश चिटणीसपदी आ. स्नेहलता कोल्हे व जिल्हाध्यक्षपदी प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती झाल्याबद्दल दोघांचा पक्षाच्या वतीने आज, गुरुवारी सायंकाळी सावेडीतील माउली संकुलात शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्या वेळी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम होते. या वेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी तयार केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती असलेल्या ‘जनकल्याण पर्व’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
पक्षाला जिल्हाध्यक्ष नसताना बेरड यांनी पक्षाची धुरा चांगल्या प्रकारे पार पाडल्याचा तसेच आ. कोल्हे यांचा महिला संघटनांत उपयोग करून घेण्यासाठी त्यांना संधी दिल्याचा उल्लेख करून शिंदे म्हणाले, देशात व राज्यात परिवर्तन झाले. भाजपच्या चांगल्या कामामुळे विरोधी पक्षांना सक्षम विरोधकांची भूमिका बजावता येत नाही. त्यासाठी रस्त्यावरही त्यांना उतरता येत नाही. नाउमेद झालेले विरोधक शिक्षण पदवी, भ्रष्टाचार झाला, असे नको ते मुद्दे उपस्थित करत आहेत.
सत्काराला उत्तर देताना बेरड यांनी कार्यकर्त्यांशी सुसंवाद ठेवण्याचे आश्वासन दिले. येत्या दि. २७ पासून जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती देताना त्यांनी पक्षाच्या महासंपर्क अभियानासाठी दक्षिण जिल्हय़ासाठी नामदेव राऊत यांची तर उत्तर जिल्हय़ासाठी सचिन तांबे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. आ. कोल्हे म्हणाल्या, आपण पक्षात नव्या असूनही जबाबदारीचे पद दिल्याने अनेक प्रतिक्रिया उमटल्या, सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिल्या गेल्या. परंतु आता पक्षानेच जबाबदारी दिल्याने नव्या-जुन्यांची तू तू मैं मैं बंद करावी. पक्षाच्या प्रदेश पातळीवर नव्यांसाठी सामंजस्य निर्माण केले जात असताना खालीही तशीच भावना कार्यकर्त्यांनी ठेवावी.
आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आदींची भाषणे झाली. नामदेव राऊत यांनी स्वागत केले. प्रकाश चित्ते यांनी प्रास्ताविक केले. अॅड. युवराज पोटे यांनी आभार मानले.
लवकरच समित्यांवर नियुक्त्या
विविध सरकारी समित्यांवरील नियुक्त्या येत्या दि. १० पर्यंत जाहीर होतील अशी घोषणा करताना पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले, की मित्रपक्ष शिवसेनेच्या आधी नियुक्त्या जाहीर केल्या असत्या तर नको ती चर्चा झाली असती. त्यामुळे काही दिवस थांबावे लागले आहे. जेथे ज्या पक्षाचा आमदार तेथे समितीमधील ७० टक्के जागा त्यांना, तर जेथे भाजप किंवा सेना या दोघांचाही आमदार नाही, तेथे ६०-४० प्रमाण ठरले आहे. प्रदेश पातळीवरील नियुक्त्या येत्या आठ दिवसांतच होतील.
विस्तारात जिल्हय़ाला संधी
भाजपचा कार्यक्रम प्रथमच वातानुकूलित सभागृहात (माउली संकुल सभागृह) झाल्याकडे लक्ष वेधताना पालकमंत्री शिंदे यांनी ही ‘अच्छे दिन’ची सुरुवात असल्याचे सांगितले. मंत्रिमंडळाच्या पुढील विस्तारीकरणात जिल्हय़ाला आणखी एक संधी मिळायला हरकत नाही, पूर्वीही जिल्हय़ात तीन मंत्री होतेच, असेही ते म्हणाले.