जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांना बरोबर घेऊन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके यांच्या विरोधाची धार बोथट करण्याची खेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली. परिणामी राष्ट्रवादीअंतर्गत पंडित-मुंडे जोडीला शह देण्यासाठी पक्षाचेच नेते सरसावल्याचे उघड झाल्याने आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बँक निवडणुकीत प्रमुख नेत्यांच्या झालेल्या युतीमुळे जि.प.मध्येही आता बदलाचे बीजारोपण झाल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीअंतर्गत नेत्यांची गटबाजी नवीन नाही. राष्ट्रवादीतील गटबाजीचा योग्य पद्धतीने फायदा उठवत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळवले. मुंडे यांच्या राजकीय वारस पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत सहापकी पाच जागा जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले. पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे त्यांच्याकडे गेली. परिणामी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने विधान परिषदेत धनंजय मुंडे यांना विरोधी पक्षनेते पद देऊन पंकजा मुंडे यांच्यासमोर विरोध उभा केला. जिल्हा परिषदेतही आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित यांना अध्यक्षपदाची संधी दिल्याने पक्षाचे दोन प्रमुख लाल दिवे मुंडे-पंडित घराण्याकडे गेले. परिणामी राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मुंडे-पंडित जोडीने पंकजा मुंडेंना घेरण्याची आघाडीच उघडली. राष्ट्रवादीअंतर्गत पक्षाची सूत्रेही याच जोडीकडे गेल्याने इतर दिग्गज नेत्यांची अस्वस्थता वाढल्याचे लपून राहिली नाही.
वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर तगडे आव्हान उभा करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँक निवडणुकीत धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित व प्रकाश सोळंके यांनी पॅनेल उभे करून भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केली. मात्र, पक्षांतर्गत इतर नेत्यांशी या जोडीचे फारसे सौख्य नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले. राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीचा नेमकेपणाने फायदा उचलण्याची संधी पंकजा मुंडे यांनी साधली. जिल्हा बँकेत मतदान झाले, तरी सहजपणे स्पष्ट बहुमत मिळत असतानाही पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस या दोन दिग्गज नेत्यांच्या समर्थकांना आपल्या आघाडीतून संचालकपद देऊन बरोबर घेतले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ संचालक बिनविरोध झाले, तर उर्वरित १४ जागांसाठीही मतदानाची केवळ औपचारिकताच राहिली आहे. राष्ट्रवादीतील दोन दिग्गजांना बरोबर घेतल्याने मुंडे, पंडित, सोळंके यांचे पॅनेल निष्प्रभ ठरले. पंकजा मुंडे यांनी जिल्हा बँकेत केलेल्या राजकीय खेळीने मुंडे-पंडित जोडीच्या विरोधाची धारच बोथट केली आहे. राष्ट्रवादीअंतर्गत आता आपणच समजून या जोडीचा उधळलेला वारू थांबविण्यासाठी पक्षाचेच नेते सरसावल्याचेही समोर आल्याने आगामी काळात राजकीय बदलाचे वारे वेगाने वाहतील, असे मानले जात आहे.
बँकेतील तीन दिग्गज नेत्यांची युती जिल्हा परिषदेमध्ये बदलासाठी पोषक ठरणार असल्याची चिन्हे आहेत. जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी २९ सदस्य असे समान संख्याबळ आहे. आमदार पंडित यांचे बंधू विजयसिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी भाजपपेक्षा राष्ट्रवादीच्याच नेत्यांची इच्छा असल्याने दोन महिन्यांपूर्वी आष्टी व बीड तालुक्यांतील सदस्यांच्या बळावर बदलाचा प्रयत्न पक्षाचे नेते अजित पवार यांनी थेट हस्तक्षेप केल्याने टळला होता. राष्ट्रवादीतूनच आता स्थानिक पातळीवर आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत पंडित हटाव मोहीम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.