यंदाचे मराठी नवीन वर्ष अहमदाबादच्या विविध भागात वास्तव्य करीत असलेल्या मराठी भाषिकांनी उत्साही वातावरणात साजरे केले. भद्र येथील महाराष्ट्र समाजतर्फे वसंत चौक ते राममंदिरापर्यंत मिरवणुकीचे आयोजन केले होते. त्यानंतर महाराष्ट्र समाज भवन आवारात पाच गुढय़ा उभारण्यात आल्या. परंपरेनुसार गुढीचे पूजन करण्यात आले. रात्रौ आठ वाजता भद्र येथील वसंत चौकात, सौ. माधुरी भावे, दीपाली देवधर व मीना मराठी यांचा सुगमसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांना संवादिनीवर संकेत कुंटे आणि तबल्यावर धवल वर्तक याने साथ केली. गुढीवर चढवलेल्या साडय़ांपैकी एक साडी एका ज्येष्ठ होतकरू महिलेस भेट देण्यात आली व इतर चार साडय़ांचा जाहीर लिलाव करण्यात आला. आमरस पुरीच्या जेवणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
सी.के.पी. समाज अहमदाबादेत भद्र येथील मंगलभुवनमध्ये प्रसिद्ध गायिका अभिनेत्री गात यांच्या सुगम संगीताच्या मैफलीचे आयोजन केले होते. सौ. गात यांना गाण्यासाठी सौ. मीना मराठे यांनी साथ केली. हार्मोनियमवर सौ. सुनयना पळसुले व तबल्यावर संकेत भोईटे यांची साथ लाभली. सौ. स्मिता कोरडे यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजाचे कार्यवाह विजय गुप्ते यांनी स्वागत केले. नववर्षांच्या शुभेच्छा देत गुढी पाडव्याचे महत्त्व थोडक्यात सांगितले. समाजाचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी गायकवृंदांचे व उपस्थित श्रोत्यांचे आभार मानले. समाजाचे विश्वस्त हेमंत घोसाळकर यांनी सौ. अभिनेत्री गात यांचा सत्कार केला. अल्पोपाहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. आंबावाडी महाराष्ट्र मित्रमंडळ या संस्थेतर्फे प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाचे ‘इस्रो’चे डॉ. मुंजाल यांचे ‘अन्टार्टिका मोहीम’ या विषयावर ‘व्याख्यान’ व ‘स्लाईड शो’ आयोजित करण्यात आले होते. रसिक श्रोत्यांकडून यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.

अहमदाबाद महाराष्ट्र समाजाचा  वार्षिकोत्सव साजरा
प्रतिवर्षांप्रमाणे यंदाच्या वर्षी अहमदाबाद महाराष्ट्र समाजाने आपला वार्षिकोत्सव उत्साही वातावरणात साजरा केला. समाजाच्या नाटय़ विभागाने धवल वर्तक दिग्दर्शित धमाल विनोदी नाटक‘शांतेचं कार्ट चालू आहे’सादर केले. त्यास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, नाटकाचे शिर्षकगीत स्मिता कोरडे यांनी लिहिले होते, तर संगीत विहंग लिमये यांचे होते.
राष्ट्रीय तरण स्पर्धेत  सौ. वैशाली वर्तक यांचे सुयश
भोपाळ येथे संपन्न झालेल्या ‘आठव्या मास्टर नॅशनल अ‍ॅक्वेटिक चॅम्पियनशिप’मध्ये अहमदाबादच्या वैशाली अविनाश वर्तक या ज्येष्ठ नागरिक गृहिणीने स्त्रियांच्या वयोगट ६० ते ६४ मध्ये ‘ब्रेस्ट स्ट्रोक’,‘बॅक स्ट्रोक’व ‘फ्रीस्टाईल’तरण विभागात दोन सुवर्णपदके व रौप्य पदक पटकाविले.
यापूर्वी अहमदाबाद येथे स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ गुजरात आयोजित पार पडलेल्या खेल महाकुंभ २०१२ मध्ये वर्तक यांनी २ सुवर्णपदके व एक रौप्य पदक पटकावून सीनियर सिटिझन्स गटाचा करंडक पटकाविला होता.
सोनिया परचुरे यांची ‘कृष्ण’ नृत्यनाटिका
(जयंत भिसे)
संतश्रेष्ठ सूरदासांच्या पारंपरिक रचना व ज्येष्ठ साहित्यकार माधव चिरमुले यांच्या श्रीकृष्णावरील काव्यरचनांच्या साहाय्याने कृष्ण जीवनांतील निवडक प्रसंग सोनिया परचुरे यांनी ‘सानंद’ इंदूर येथे सादर केले.सुमारे २२ कलाकारांच्या समूहात सौ. संपदा जोगळेकर-कुलकर्णी व नकुल घाणेकर प्रमुख होते. कृष्णाच्या बाललीला, माखनचोरी, विश्वरूप दर्शन, पूतनावध, गीतोपदेश असे अनेक प्रसंग क्रमवार, सोनिया परचुरे यांनी आपल्या समूहासह सादर केले. प्रत्येक प्रसंगात कथ्थकता शास्त्रीयपक्ष सांभाळून अभिनयाच्या माध्यमाने भावभावना सादर केल्या गेल्या. ‘पूतनावध’ सादरीकरणाचा प्रसंग विशेष दाद मिळवून गेला. सोनिया परचुरे यांनी पूतनेच्या मनातला भाव व वरकरणी दर्शवीत असलेला प्रेमळभाव समर्थपणे सादर केला. क्षणाक्षणाला बदलणारे भाव एका क्षणात विभत्सरस तर दुसऱ्या क्षणी वात्सल्यरस दाखवून, त्यांनी आपल्या नृत्य अभिनयाची जाणीव इंदूरकर रसिकांना करून दिली. संपदा जोगळेकर यांनी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात ठसलेली यशोदा हुबेहूब प्रस्तुत केली. नकुल घाणेकर यांनी सादर केलेला कथ्थकचा शास्त्रोक्त पक्ष नृत्य जाणकार दर्शकांची दाद मिळवून गेला. प्रत्येक प्रसंगाच्या सादरीकरणात सगळ्या कलाकारांचा समन्वय, देहबोली दर्शकांचे लक्ष वेधून येत होते. नृत्यनाटिकेचे संगीत कौशल इनामदार यांचे तर ताल संयोजन पं. मुकुंदराव देव यांचे होते. गायन संजीव चिमलगी व हमसिका अय्यर यांचे होते. शास्त्रीय नृत्याच्या माध्यमातून एखादी गोष्ट तितकी प्रभावीपणे मांडली जाऊ शकते याची जाणीव इंदूरच्या रसिकांना झाली. याप्रसंगी, ‘रसिकराज इंदूरकरांची मला व माझ्या साथीदारांना दाद मिळणे हा माझ्या कलाप्रवासातील मोठा प्रसंग आहे’ असे सांगून सोनिया परचुरे यांनी इंदूरच्या रसिक प्रेक्षकांची वाखाणणी केली. सानंद इंदूरच्या रसिकतेला प्रणाम करून, नेमकी व खुली दाद कलाकाराला उत्तम कला सादर करण्यासाठी प्रोत्साहित करते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाचा प्रारंभ युवा उद्योजक राहुल फडणीस यांनी दीप प्रज्वलन करून केला. सर्व अतिथी व कलाकारांचे स्वागत सानंदचे अध्यक्ष सुधाकर काळे, मानद सचिव जयंत भिसे यांनी केले.