श्री साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवास शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेल्या पालख्यांमुळे साईगजराने शिर्डी दुमदुमून गेली आहे.
गुरुपौणिमेच्या निमित्ताने सुमारे ५० पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. पुणे येथून आलेल्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या निमित्ताने बंगलोर येथील दानशूर साईभक्त श्री सुब्रामणी राजू व प्रसाद बाबू यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रींच्या प्रतिमेची व साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य तथा संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदनकुमार सोनवणे व उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे आदी सहभागी झाले होते. उद्या शनिवारी उत्सवाचा मुख्य दिवस असून त्यानिमित्त मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. परवा (रविवार) उत्सवाची सांगता होणार आहे.