उमरगा तालुक्यातील माडज प्रशालेच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त करून खरे स्वच्छता अभियान राबविले. मिशन-ए-शोषखड्डा उपक्रमात शिक्षकांच्या मदतीने या विद्यार्थ्यांनी घरातून रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याला पायबंद घातला.
गावातील अस्वच्छता, रोगराई व डासांचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला. गावात गटारी नावापुरत्या आहेत. त्यामुळे दैनंदिन धुण्या-भांडय़ाचे पाणी घराच्या मोरीतून थेट रस्त्यावर सोडले जात होते. गावातील सर्व रस्त्यांवर सांडपाण्याचे साचलेले डबके, त्यामुळे सुटलेली दरुगधी, डासांचा प्रादुर्भाव, त्यातून येणारा डेंग्यू अशा दुष्टचक्रात गाव पुरते बुडाले होते. मात्र, हे सगळे कायमचे थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात खोरे-टिकाव घेत मिशन-ए-शोषखड्डा अभियान राबविले. गावातील प्रत्येक घरासमोर शोषखड्डा खणण्यात आला. काही ग्रामस्थांनी सुरुवातीला घरासमोर शोषखड्डा घेण्यास विरोध केला. मात्र, गावातून मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून नंतर विद्यार्थ्यांसह या अभियानात आनंदाने सहभागी होत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डा घेण्यास सहकार्य केले. विद्यार्थ्यांना या कामात गावकऱ्यांनी खड्डय़ासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. रस्त्यांवरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे उडय़ा मारतच चालावे लागत होते. आता शोषखड्डे झाल्याने सांडपाण्याचा निचरा होऊ लागला आहे. परिणामी गावातील पाणीपातळी वाढण्यास त्याची मदत होणार आहे.
सप्रात्यक्षिकाचा आनंद!
शाळेत आठवीच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व व अस्वच्छतेचे दुष्परिणाम शिकवत होतो. अस्वच्छतेचे व्यक्ती, समाज व गावावर होणारे दुष्परिणाम त्यांना उदाहरणासह सांगितले. त्यातूनच शोषखड्डय़ाचा उपाय सुचल्याचे माडज प्रशालेतील शिक्षक बालाजी इंगळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनाही हा उपाय पटला. त्यांनी घरच्या मंडळींना विश्वासात घेऊन आपल्या घरासमोर शोषखड्डा करण्यास तयार केले. प्रशालेतील शिक्षकांना सोबत घेऊन हे मिशन सुरूकेले आणि संपूर्ण गाव सांडपाणीमुक्त करण्यात यश आले. विद्यार्थ्यांनी गावात ४६ शोषखड्डे घेतले. आता डेंग्यूची भीती नाही, हेच खरे स्वच्छता अभियान असल्याचे सप्रात्यक्षिक समजावून सांगण्याचा आनंदही इंगळे यांनी व्यक्त केला.