उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालला आहे. गावागावातून पाण्यासाठी टँकरची मागणी होऊ लागली आहे, तर हंडाभर पाण्यासाठी दिवसभर भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे विहिरीतून पाणी काढताना तोल गेल्याने विहिरीत पडलेल्या २२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कारेगव्हाणच्या महिलांनी पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर, तर उमापूरच्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा काढून संताप व्यक्त केला.
जिल्ह्यात सरासरीपेक्षा निम्माही पाऊस न पडल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मे महिन्याच्या अखेरीस उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने पाण्याची टंचाईही भीषण होऊ लागली आहे. गावागावातून पाण्यासाठी टँकरची मागणी होत असल्याने प्रशासनालाही पाणी कोठून आणायचे, असा प्रश्न पडला आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे बाराभाई तांडय़ावर वनिता सचिन पवार (वय २२) ही महिला गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास पाणी शेंदताना विहिरीत पडली. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. कारेगव्हाण येथील महिलांनी पाण्यासाठी संतप्त होऊन सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडामोर्चा काढला, तर उमापूर येथे महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढून संताप व्यक्त केला.