अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची १३८ वी पुण्यतिथी गुरुवारी भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात साजरी झाली. मात्र यंदा प्रखर उन्हाळा व पाणीटंचाई यामुळे भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे पाहावयास मिळाले. वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गेल्या आठवडय़ापासून धर्मसंकीर्तन सोहळा संपन्न होत आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. गुरुवारी स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. दुपारी महाआरती होऊन मानाप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला. नैवेद्य अर्पण करण्याचा मान परंपरेनुसार अक्कलकोट संस्थानाच्या भोसले घराण्याकडे आहे. त्यानुसार सुनीताराजे भोसले यांनी दुपारी वटवृक्ष मंदिरात येऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले व नैवेद्य अर्पण केला. या वेळी स्वामी नामाच्या जयजयकाराने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.  पुण्यतिथी सोहळ्यातील सर्व कार्यक्रम यशस्वी व्हावेत, भाविकांना दर्शन व्यवस्थेसह चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते. मात्र यंदा अस्वस्थ करणारा उन्हाळा आणि पाणीटंचाईमुळे भाविकांची संख्या कमालीची रोडावल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतील आर्थिक उलाढालीवर झाला. सायंकाळी मंदिरातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. पालखी मार्गावर अनेक ठिकाणी सुंदर रांगोळ्यांच्या माध्यमातून पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. टाळ-मृदुंगांसह स्वामी नामाचा गजर, विविध पारंपरिक वाद्यांचा निनाद, हत्ती-घोडय़ांचा थाट, उंचावणाऱ्या भगव्या पताका अशा उत्साही वातावरणात पालखी सोहळा अक्कलकोट नगरीत चालत होता. श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या चोळप्पा मठासह श्री स्वामी समर्थ महाराजांचे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वास्तव्य होते, त्या शेख नुरूद्दीन बाबांच्या दर्गाह येथेही दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली होती.  पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम चालले होते. दुपारी श्री स्वामी समर्थ महाराजांना महानैवेद्य अर्पण केल्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजय भोसले, सचिव श्याम मोरे यांच्यासह अमोल भोसले, अभय खोबरे व त्यांच्या सहक ऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते.

सोलापूरच्या धार्मिक पर्यटनावरही परिणाम

सोलापूर – मराठवाडय़ाच्या तुलनेत सोलापूर जिल्हय़ातील पाणीटंचाई कमी असली तरी उन्हाळय़ाची तीव्रता अधिक आहे. त्याचा फटका येथील पर्यटनाला बसू लागल्याचे दिसून येते. पंढरपूर, अक्कलकोटसह आसपासच्या धार्मिक पर्यटनस्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या अलीकडे रोडावली आहे. त्याचा परिणाम अर्थकारणावर होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुत दररोज सुमारे २५ हजार भाविक येतात. आषाढी व कार्तिकीसह प्रमुख चार यात्रांच्या काळात लाखो भाविक येतात. नुकतीच चैत्री एकादशी यात्रा पार पडली, परंतु ही यात्रा एरव्ही छोटी असली तरी त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दोन लाखांच्या पुढे असते. परंतु यंदा सोलापूर जिल्हय़ात उन्हाळय़ात वाढलेले तापमान असहय़ ठरले आहे. ४२ ते ४४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा कायम राहात आहे. त्यामुळे उष्मा वाढला आहे. दुसरीकडे कमीजास्त प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. त्याची झळ पर्यटनाला बसू लागली आहे. पंढरपुरात दररोज येणाऱ्या भाविकांच्या संख्येत घट होऊन ती २५ हजारांवरून १५ हजारांपर्यंत खाली आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोकण आदी भागांतून येणारे भाविक उन्हाळा व काही प्रमाणात पाणीटंचाईमुळे सोलापूर जिल्हय़ातील पर्यटन टाळत आहेत. पंढरपूरप्रमाणेच अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही घटली आहे. अक्कलकोट येथे दररोज १५ हजारांपर्यंत भाविक येतात. भाविक मुख्यत्वे मुंबई, पुणे, ठाणे व कोकणातून येतात. परंतु येथील तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल्यामुळे उष्मा चांगलाच जाणवतो. अशा उष्म्याची सवय नसल्यामुळे भाविक अक्कलकोटला येण्याचे टाळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाच हजारांपर्यंत खाली आली आहे.

पंढरपूरच्या तुलनेत अक्कलकोट येथे पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. तब्बल १२ ते १५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे अक्कलकोट येथे यात्री निवासात मुक्काम करणे टाळले जाऊ लागले आहे.  पाणीटंचाईचा फटका स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळालाही बसत असून मंडळाने पाणीटंचाईमुळे भाविकांना सेवा देऊ शकत नसल्यामुळे यात्री निवास बंद केले आहेत. पाणीटंचाईमुळे भाविकांना बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे पाणी विक्रीत लाखोंची उलाढाल होऊ लागली आहे.