मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यास खूप वर्षे लागतात. त्याचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळत नाही. त्याचे उत्तम उदाहण म्हणजे गोसेखुर्द प्रकल्प होय. हा प्रकल्प १९८३ पासून सुरू झाला आणि कुठल्याही परिस्थितीत अजून पाच वर्षे तरी तो पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्यात भाजप सत्तेत आल्यावर पहिल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भंडारा जिल्ह्य़ातील गोसेखुर्द धरणाला भेट दिली होती. धरणाचा अभ्यास दौरा केल्यानंतर त्यांनी हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्णत्वास येणार असल्याची माहिती दिली, परंतु आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आणखी काही दिवस वाट बघावी लागणार असल्याचे सांगितले.
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानाची कार्यशाळा नागपुरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाची बरीच कामे अद्याप अपूर्ण आहेत. हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सरकार त्यासाठी पुरेसा निधी आणि पाठबळ पुरवित आहे. तरीही कुठल्याही परिस्थितीत पाच वर्षे हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता नाही, असेही ते म्हणाले.
वैनगंगा नदीवर असलेला गोसेखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ातील सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या भागातील जनता ३० वर्षांपासून शेतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मोठय़ा सिंचन प्रकल्पांना बराच कालावधी लागतो. यामुळे मोठय़ा धरणांऐवजी नैसर्गिक नाल्याचा वापर करून जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. यात लहान-सहान कामे करून गावागावात पाणी उपलब्ध होणार आहे. कोणतीही योजना म्हणजे आपली तिजोरी भरण्याची संधी काहींना वाटते, परंतु या अभियानात ही संधी नाही. कामाच्या सुरुवातीची आणि काम झाल्यावरची डिजिटल छायाचित्रे काढणे आवश्यक आहे. अशाही परिस्थिती कुणी कुचराई केल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.