केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतील भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे आपल्याजवळ असल्याचा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग)ने आपल्या अहवालातून ५२ हजार कोटींच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीतील ‘गैरव्यवहारां’बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत बोलताना, राज्य सरकारची जर इच्छा असेल तर माझ्याजवळ या गैरव्यवहारांबाबत पुरेसे पुरावे आहेत आणि सरकारकडे ते हस्तांतरित करण्याची माझी तयारी आहे, असे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला सध्या दुष्काळाने ग्रासले आहे. हा दुष्काळ म्हणजे नैसर्गिक आपत्ती नसून हे संकट मानवनिर्मित आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी केला. राजकीय अनास्था, भ्रष्टाचार आणि जलस्रोतांचा अर्निबध वापर यामुळे हे संकट राज्यावर ओढवल्याचे हजारे म्हणाले. पंतप्रधानपदाच्या उमेदवारांबाबत विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना, राहुल गांधी काय किंवा नरेंद्र मोदी काय, दोघांपैकी कोणीही देशासमोरील प्रश्न सोडवू शकणार नाही, असा नकारात्मक सूर अण्णांनी लावला.