युग मुकेश चांडक या आठ वर्षीय चिमुकल्याचे खंडणीसाठी अपहरण आणि निर्घृण खुनाच्या प्रकरणात दोन्ही आरोपींना नागपूरमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कायम ठेवली. हा खून दुर्मिळातील दुर्मिळ याच प्रकारात मोडणारा आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना समाजात परतण्याची संधी देणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
१ सप्टेंबर २०१४ रोजी सायंकाळी युग हा शाळेच्या बसमधून घरासमोर उतरल्यावर आरोपी राजेश दवारे (२३) आणि अरविंद सिंग (२१) यांनी त्याचे अपहरण केले. त्याला दुचाकीवरून प्रथम आपल्या घरी आणि त्यानंतर नागपूरपासून २७ किमीवरील पाटणसावंगी परिसरात ते घेऊन गेले. तेथे लोणखरी परिसरातील एका नाल्यात युगचा निर्घृण खून करून त्याला तेथेच वाळूमध्ये पुरले. युगला संपविल्यावर आरोपींनी डॉ. मुकेश चांडक यांना भ्रमणध्वनी करून प्रथम १० कोटी आणि नंतर ५ कोटींची खंडणी मागितली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला आरोपींनी पोलिसांसमोर अपहरण आणि खुनाची कबुली दिली. त्यानंतर २ सप्टेंबर २०१४ च्या रात्री आरोपींनी युगचा वाळूत पुरलेला मृतदेह पोलिसांना दाखविला. जिल्हा व सत्र न्यायाधीश के. के. सोनवणे यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली होती. युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती उच्च न्यायालयाने कायम ठेवली.