येथील जि. प. विद्यानिकेतन विद्यालयात शुक्रवारी सकाळी साफसफाईच्या कारणावरून शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क शिक्षकालाच मारहाण केल्याचा प्रकार घडला. सकाळी साडेसाठ वाजण्याच्या सुमारास विद्यानिकेतनचे मुख्याध्यापक बी. एस. भावसार यांनी आपल्या सहकारी शिक्षकांना शाळेच्या आवारात वाढलेले गवत काढण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकांनी साफसफाई केली. मात्र काही भागात काटेरी झुडुपे असल्याने येथील गवत निघू शकले नाही. या दरम्यान शिक्षक पी. एन. पवार व सादरे हे उभे असताना मुख्याध्यापक भावसार यांनी त्यांना ते गवत का काढले नाही, अशी विचारणा केली. काटेरी झुडुपे असल्यामुळे ते गवत नंतर काढू असे सांगितल्याने भावसार संतापले आणि अर्वाच्य भाषेत बोलू लागले. पवार यांनी त्यांना असे न करण्यास सांगितले असता उभयतांमधील वाद अधिकच वाढला. या वेळी मुख्याध्यापकांनी आपणास मारहाण करून शर्ट फाडल्याची तक्रार पवार यांनी केली. या घटनेची माहिती समजल्यावर भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मुख्याध्यापकांची चांगली कानउघाडणी केली. साफसफाईचे काम शिक्षकांचे नाही. शिपाई किंवा सफाई कर्मचाऱ्यांकडून ही कामे गरजेची असताना शिक्षकांना अशी कामे लावताच कशी, असा जाब विचारला. त्यानंतर मुख्याध्यापक नरमले व वाद निवळला. दरम्यान, हा प्रकार सुरू असताना बघ्यांची शाळेची मोठी गर्दी शाळेत झाली होती.