बनावट डॉक्टर तयार होऊ नयेत यासाठी प्रश्नपत्रिका तपासणीच्या मूल्यांकन पद्धतीत काही बदल करण्यात आले असले तरी विद्यार्थी हिताच्या दृष्टीनेच मूल्यांकन पद्धतीचा विचार करण्यात येईल. यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेसोबत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी येथे दिली.
आरोग्य विद्यापीठाच्या वतीने संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत असते. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तपासणीकरिता करण्यात येणाऱ्या दुहेरी मूल्यांकनाचा विषय सध्या गाजत आहे. त्या अनुषंगाने विविध मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत. ‘मार्ड’सह चार विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाही सादर केली आहे. दुहेरी मूल्यांकनाबाबत कुलगुरू डॉ. जामकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत विद्यापीठाची भूमिका मांडली.
उन्हाळी २०१३ सत्रातील पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या वेळी दुहेरी म्हणजेच पुनर्मूल्यांकन पद्धत लागू असल्यामुळे त्यानुसार उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात यावी, नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षा या लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात, राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून ज्याप्रमाणे अधिकचे गुण (ग्रेस मार्क) दिले जातात, त्या धर्तीवर पदव्युत्तर पदवीकरिता अधिकचे गुण देण्यात यावेत, अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत काही बदल करावयाचे असल्यास ते बदल अभ्यासक्रम सुरू होण्याअगोदर विद्यार्थ्यांना कळविणे बंधनकारक करावे आदी विद्यार्थ्यांच्या मागण्या असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
यासंदर्भात उच्च न्यायालयात अधिकचे गुण देण्याची तरतूद विद्यापीठास लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अपूर्णाकित गुण हे नजीकच्या पूर्णाकांत विद्यापीठाने रूपांतरित केले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा या लेखी परीक्षेनंतर घेतल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर कुठलाही परिणाम होत नाही. पूर्वीच्या पद्धतीत पुनर्मूल्यांकनाची तरतूद नव्हती.
सर्वच विद्यार्थ्यांना आता पुनर्मूल्यांकनाची सुविधा प्राप्त झाल्यामुळे वेळेची बचत होते. अभ्यासक्रम अथवा परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आलेला नाही. मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन पद्धती या परीक्षा पद्धतीचा भाग होऊ शकत नाही, असा निर्णय देण्यात आला असल्याची माहितीही डॉ. जामकर यांनी या वेळी दिली.
२९ ऑक्टोबर रोजी विद्या परिषदेसोबत होणाऱ्या बैठकीत न्यायालयाचा अवमान न होता विद्यार्थ्यांचे हित कशा पद्धतीने जोपासता येईल, याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले.
पत्रकार परिषदेस विद्यापीठाचे संदीप कुलकर्णी, डॉ. शेखर राजदरेकर, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर आदी उपस्थित होते.