सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील पाच हजार मच्छीमारांच्या आरोग्याची तपासणी मालवण येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे. हे निरोगी मच्छीमार अभियान १६ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.
रेडकर हॉस्पिटलमागील २५ वर्षे आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधन, जागृती तसेच रोग नियंत्रण क्षेत्रात संस्थाध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम सुरू आहे. जिल्ह्य़ातील मधुमेह आणि हृदयरोग निदान करून रुग्णांना जागृत करतानाच आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी संस्थेने मालवण, सावंतवाडी, रेडी, शिरोडा, मळेवाड, गोवा येथे मधुमेह रिसर्च सेंटरदेखील सुरू केली आहेत. ‘आजोळ’ या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सेवा केंद्राद्वारे ज्येष्ठांसाठीदेखील काम करत आहे. जिल्ह्य़ातील हृदयरोग, रक्तदाब, बॉडीमास इंडेक्स यांचा सहभाग आहे. या उपक्रमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासनाला प्रस्ताव सादर करून मच्छीमारांसाठी मोफत उपचार करण्यासाठी ‘निरोगी मच्छीमार अभियान’द्वारे पाठपुरावा करण्यात येणार आहे. डॉ. विवेक रेडकर यांनी या ‘निरोगी मच्छीमार’ अभियानाची माहिती दिली. यावेळी नॅशनल फोरमचे रविकिरण तोरसकर व डॉ. दर्शन खानोलकर उपस्थित होते. मत्स्य व्यवसायाशी निगडित असलेला पारंपरिक मच्छीमार शाश्वत मासेमारीद्वारे आपली उपजीविका करीत आहे. आर्थिक दुर्बलता तसेच संघर्षमय जीवन शैलीमुळे त्यांना आरोग्यविषयक काळजी घेता येत नाही. त्यामुळे रक्तदाब, मधुमेहसारख्या आजाराच्या समस्या आहेत असे ते म्हणाले. निरोगी मच्छीमार अभियान १६ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. त्यानंतर अभियानांतर्गत गुरुवार ते रविवार या काळात दररोज २५ व्यक्ती याप्रमाणे वर्षांला पाच हजार मच्छीमारांची आरोग्य तपासणी संस्थेच्या विविध केंद्रात करण्यात येणार आहे. मधुमेह, हृदयरोग व रक्तदाब तपासणीसाठी नाममात्र दहा रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. वर्षअखेर पाच हजार मच्छीमारांची आरोग्य तपासणीची माहिती संकलित करून संशोधन प्रबंध राज्य व केंद्र सरकारद्वारे सादर करण्यात येईल असे डॉ. विवेक रेडकर म्हणाले. या प्रबंधाचा उपयोग भारतीय किनारपट्टीवरील मच्छीमारांचे आरोग्य धोरण बनविण्यास उपयोगी ठरेल असा विश्वास डॉ. रेडकर यांनी व्यक्त केला. मालवण येथील डॉ. रेडकर हॉस्पिटलमध्ये अभियान सुरू होईल. नॅशनल फोरमचे रविकिरण तोरसकर यांचे कार्यालय किंवा मच्छीमार संघटनांच्या प्रतिनिधीकडे नावनोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. रेडकर यांनी केले.