देशभर उष्णतेची लाट पसरत असतानाच चंद्रपूर शहरात शुक्रवारी पुन्हा ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हा़ळ्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हा तापण्यास सुरुवात झाली होती. यंदा जिल्ह्य़ाचे तापमान ४५, ४६, ४७ अंशावरच होते.   
सकाळपासून शहरात संचारबंदी सदृश्य चित्र होते. कारण, घराबाहेर पडल्यास उन्हाचे चटके व कमालीचा उष्मा अनुभवयास मिळत होत्या. घरातील पंखे व वातानुकूलन यंत्रणाही उष्म्यापुढे कुचकामी ठरत होती.

 तप्तमान..
ब्रह्मपुरी- ४७.०, नागपूर- ४६.६, वर्धा- ४६.६, अकोला- ४५.१, यवतमाळ- ४४.४, वाशीम- ४२.६, अमरावती- ४२.२ व बुलढाणा- ४१.०
(अंश सेल्सिअसमध्ये)

देशात २००५ बळी
देशात उष्म्याच्या लाटेने एकूण २००५ बळी घेतले आहेत. तेलंगणात काल आणखी ४९ जण मरण पावल्याने मृतांची संख्या वाढली. ओडिशात भवानीपाटणा येथे आज ४६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. दिल्लीत ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राजस्थानात कोटात ४४.६ अंश, तर जयपूरला ४३.९ अंश तापमान नोंदले गेले. पंजाब व हरयाणात ४०-४४ अंश तापमान होते. तेलंगणात मृतांची संख्या ४८९ झाली आहे, तर आंध्रातील मृतांची संख्या १३३४, तर ओडिशातील मृतांची संख्या ४३ आहे. गुजरातेत सात, तर दिल्लीत दोनजण उष्म्याच्या लाटेत मरण पावले आहेत.