शाळा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याच्या कारणावरून शाहूवाडी पंचायत समितीच्या माजी सभापती प्रभावती पोतदार व गटशिक्षण अधिकारी बी. जी. कमळकर यांच्यात बुधवारी जिल्हा परिषदेत शाब्दिक खडाजंगी झाली. परस्परांना आव्हान प्रतिआव्हान देण्याचा प्रयत्न झाला. संतापलेल्या पोतदार यांनी कमळकर यांना सँडेलने मारहाण केली. या प्रकाराने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याप्रकरणी प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिका-यांना चौकशी करण्याचेआदेश दिले आहेत.    
हालसवडे (ता. शाहूवाडी) येथे एका शाळा खोलीचे बांधकाम झाले आहे. या बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला मिळावा यासाठी माजी सभापती पोतदार या शाहूवाडी गटशिक्षणाधिकारी कमळकर यांच्याकडे पाठपुरावा करीत होत्या. मात्र दाखला मिळण्यास विलंब होत होता. त्यावरून दोघात पूर्वी वादही झाला होता.
या कामाची तक्रार देण्यासाठी पोतदार बुधवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कार्यालयाकडे आल्या होत्या. तेथेच कमळकरही कामानिमित्त आले होते. कमळकर यांना पाहताच पोतदार याचा रागाचा पारा चढला. त्यातून दोघांमध्ये शिवीगाळ सुरू झाली. परस्परांना चपलेने मारण्याची धमकीही दिली गेली. अशब्दांचा मारा वाढू लागला. त्यामुळे पोतदार यांनी सँडेलने कमळकर यांना मारहाण केली. अखेर काहींनी मध्यस्थी करून हा प्रकार थांबवला तरी त्याची जिल्हा परिषदेत दिवसभर चर्चा सुरू होती. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांना विचारले असता त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत पोतदार यांनी आपणास निवेदन दिले असल्याचे सांगितले. तसेच कमळकर यांना लेखी म्हणणे मांडण्याची सूचना दिलेली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिका-यांना दिलेले आहेत.