पाचगणी परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावासमुळे परिसरातील जमिनीला भेगा आणि घरांना तडे जाण्याच्या घटना घडल्या आहेत. परिसरातील रूईघर (ता.जावली) या गावाची गणेशपेठ ही वस्ती पाचगणीपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसली आहे. या परिसरात जमिनीला मोठय़ा भेगा पडल्याचे गुरुवारी उघडकीस आले आहे. या वस्तीतीलच दोन घरांना तडे जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका घराची सुरक्षाभिंत अन्य घरावर पडल्यानेही मोठे नुकसान झाले आहे. तडे गेलेल्या या घरातील रहिवाशांना अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे. दुसरीकडे पाचगणीहून कुडाळकडे जाणाऱ्या घाट रस्त्यालाही मोठे तडे गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी  धेाकादायक बनला आहे.
दरम्यान, जमिनीला पडलेल्या भेगा, घरांना गेलेले तडे आणि खचलेला घाटमार्ग या साऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान महाबळेश्वरसह पाचगणी परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळत असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी वृक्ष पाडण्याचे प्रकार घडले आहेत. आज सकाळपर्यंत पाचगणी शहरात ३९ मीमी पाऊस पडला असून आजअखेर ११५९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.