काल विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सतत पडणाऱ्या पावसामुळे अजूनही जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली आहेत. कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी ३३ फूट  ४ इंच असून राधानगरी धरणातून २०० क्यूसेक्स तर घटप्रभा नदीतून ९२४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टीमुळे एस.टी.चे  एकूण ९ मार्ग अंशत बंद करण्यात आले असून २ मार्गासाठी पर्यायी मार्ग चालू ठेवण्यात आले. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.
आठवडाभर हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी विश्रांती घेतली होती. काल दिवसभर उन-पावसाचा खेळ सुरू होता. नदीतील पाण्याची पातळी काहीप्रमाणात कमी झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच पावसाने बरसण्यास सुरूवात केली. तासाभराच्या अंतराने जोरदार पावसाच्या सरी दहा ते पंधरा मिनिटे कोसळत होत्या. त्यामुळे शहरातील जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. पाऊस पडत असताना रस्त्यावरील वाहतूक तुरळक प्रमाणात असल्याचे दिसत होते. तर पावसाने उघडीप घेतल्यावर रस्ते वाहने व गर्दीने फुलून जात होती. संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. पाणलोट क्षेत्रात  तर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. धरणातील जलसाठय़ांमध्ये आज चांगलीच वाढ झाली असून नद्यांची पाणी पातळीही वाढत चालली आहे. १ जूनपासून आजअखेर सरासरी ५४५.३९ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंतच्या पावसाने जिल्ह्यातील २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोदे लघु पाटबंधारे आणि घटप्रभा धरणे पूर्ण भरलेली आहेत. भोगावती, खडक कोगे, सरकारी कोगे, हळदी, राशिवडे, तुळशीचे बीड, वारणेचे चिंचोली, माणगांव, कासारीचे यवलूज, ठाणे-आळवे, पुनाळ तिरपण, वालोली, बाजार भोगाव, पेंटाकळे, जांभळीचे माणवाड (खापणेवाडी), वेदगंगेचे निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे आणि पंचगंगेचे िशगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, इत्यादी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यात झालेल्या काही ठिकाणच्या अतिवृष्टीमुळे तसेच कच्च्या रस्त्याचे निसरडे, खराब रस्ता, धरणाचे पाणी रस्त्यावर आल्याचे राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रकांनी कळविले आहे. संभाजीनगर आगाराच्या रंकाळा स्टँड पासून मानबेटकडे जाणाऱ्या गाडय़ा सुतारवाडीपर्यंत चालू ठेवण्यात आल्या आहेत. रंकाळा स्टँड ते स्वयंभुवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर कोगे धरणावर पाणी आल्याने बीडमाग्रे वाहतूक वळविण्यात आली आहे. गोतेवाडी, गांवडी, बुरुंबाळ, कमदमवाडी, तसेच मलकापूर उदगिरकडे जाणाऱ्या आणि गारगोटी- भुदरगड किल्ला,गारगोटी, चौके, हेळेवाडीकडे जाणाऱ्या, तसेच एस.टी.बसेस कच्चा रस्ता, पावसामुळे झालेले निसरडे अशा कारणांने अंशत बंद करण्यात आल्या आहेत. गारगोटी-कोल्हापूर परतीच्या मार्गावर महालवडे येथे रस्ता खराब झाल्याने म्हसवे बंधाऱ्यावरुन पर्यायी वाहतूक सुरु आहे.