दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. ४८ तास झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे धरण व नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील कळे-साळवण येथे नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वैभववाडीकडे करूळ व भुईबावडा घाटातून कोल्हापूरकडे होणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरील वाहतूक फोंडा घाट माग्रे राधानगरीकडून कोल्हापूरकडे वळविण्यात आली आहे.
कोल्हापूर व आसपासच्या भागात गेल्या आठ दिवसांपासून  मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती पण मंगळवारपासून पावसाची संततधार सुरू झाली होती. पावसाचे प्रमाण वाढणार असे वाटतच असतानाच गुरुवारी पावसाने उसंत घेतली. दरम्यान, जोरदार पावसामुळे त्या भागातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कळे-साळवण जवळ असणा-या नदीचे पाणी कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर आल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारपासून ठप्प झाली आहे.
दुस-यांदा दक्षिणद्वार सोहळा
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात सकाळी १० वा चढता दक्षिणद्वार सोहळा गुरुवारी संपन्न झाला. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. उत्तरेकडून येणारा पाण्याचा प्रवाह श्रींच्या पादुकांवरून वाहत जाऊन तो दक्षिणेस निघून जातो. यास दक्षिणद्वार सोहळा असे म्हणतात. या वर्षी दुस-यांदा हा सोहळा झाला असून श्रावण गुरुवार असल्याने भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली.