संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी सकाळपासून पावसाचा जोर असल्यामुळे कृष्णा आणि भीमा खोऱ्यांतील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी थांबविण्यात आली. पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील पूलावर ४२ फूट उंचीवर असलेल्या माश्याच्या प्रतिकृतीला नदीचे पाणी लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच आहे.
पुणे जिल्ह्यातून कल्याण दिशेने जाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक तूर्त बंद करण्यात आली आहे. या भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने घाटातील रस्ता खचल्याचे शुक्रवारी दिसून आले. या ठिकाणी रस्त्याला सुमारे ४ फूट खोल भेग पडली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने माळशेज घाटातील वाहतूक बंद करण्यात आली होती.