दुष्काळामध्ये ज्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता, त्या लातूर शहराचा दुष्काळ पूर्णत: दूर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरासरीच्या १०५ टक्के पाऊस नोंदविण्यात आला असून नदी-नाले दुथडी भरून वाहात आहेत. औराद शहाजानी येथे गुरुवारी एक ट्र्ॅक्टर वाहून गेला. सततच्या पावसामुळे गावोगावचे शेतकरी अतिशय हताश झाले आहेत. खरिपाचा हंगाम या अतिवृष्टीमुळे हातचा गेला असून आता रब्बी हंगामावर आपली भिस्त ठेवत शेतकरी पावसाच्या उघडिपीची वाट पाहतो आहे.

उत्तरा नक्षत्रात पाऊस रोजच उतरत असल्यामुळे जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी अशी शेतशिवाराची अवस्था झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाला तोंड द्यावे लागणाऱ्या लातूर जिल्हय़ाला यावर्षी परतीच्या पावसाने चांगलाच हात दिला आहे. लातूर जिल्हय़ाच्या इतिहासात आतापर्यंत परतीचा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात कधीही झालेला नव्हता.