बऱ्याच दिवसांनी वेधशाळेचा अंदाज खरा ठरवत रत्नागिरी शहरासह जिल्ह्य़ात शनिवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात झालेल्या उत्तम पावसानंतर जिल्ह्य़ात पावसाने हुलकावणीच दिली होती. गेले सुमारे तीन आठवडे सर्वत्र उन-पावसाचा खेळ अधूनमधून चालू होता. पण त्या पावसामध्ये विशेष जोर नव्हता. शनिवारी मात्र पहाटेपासूनच पावसाच्या मोठय़ा सरी कोसळू लागल्या आणि हा जोर दिवसभर कायम राहिला.

जिल्ह्य़ात शुक्रवारपासूनच अतिवृष्टीचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. पण तसा पाऊस झाला नव्हता. शनिवारी मात्र ही कसर भरून निघाली. पावसाचा हा जोर रविवारीही राहील, असा अंदाज  वेधशाळेने व्यक्त केला आहे. दरम्यान गेले काही दिवसांच्या उघडीपीमुळे भातपिकावर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण शनिवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र हा जोर आणखी काही दिवस टिकून राहण्याची आवश्यकता आहे.

 

रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस

अलिबाग : जवळपास पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी रायगड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत आणि खोपोली या तालुक्यात पावसाचा जोर दिसून आला. संततधार पावसामुळे उरण, पनवेल आणि पेण परिसरातील सखल भागात पाणी साचले होते.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी ८८४ मिलीमिटर पाऊस पडतो, पण यावर्षी १८ दिवसांत सरासरी २४३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी धास्तावले होते. पावसाने ओढ दिल्याने पिकांवर किड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर पाण्याअभावी पिक पिवळी पडण्याची भिती होती. मात्र शनिवार सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या लहान मोठय़ा सरी कोसळण्यास सुरूवात झाली. त्यामुळे भातशेतीवर घोंगावणारे संकट दूर झाले.

दक्षिण रायगडातील तालुक्यांच्या तुलनेत उत्तर रायगडातील पनवेल, उरण, पेण, कर्जत, खालापुर, अलिबाग या तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे यांसारख्या घटना घडल्या. दरम्यान पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे समुद्राला सलग तीन दिवस साडेचार मिटरहून अधिक उंचीची उधाण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी, खाडी आणि समुद्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.