ऐन गणेशोत्सवात अर्थात शनिवारी रात्रीपासून जिल्ह्य़ाच्या सर्वच भागांना पावसाने झोडपून काढले आहे. गुहागर तालुक्यातील पालशेत येथे घरे व दुकानांत पाणी शिरले असून पालशेत पुलावरून पाणी वाहू लागल्याने हेदवी, अडुर परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.
संगमेश्वर बाजारपेठेत शात्री आणि सोनवी नदीचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे तर देवरुख-संगमेश्वर रस्त्यावरील वाहतूकही काही तास बंद झाली होती. कसबा, कुंभारखाणी खुर्द गावाकडे जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले असून माखजन व फुणगुस
बाजारपेठही पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर चिपळूण तालुक्यातील टेरव गावाचा एक शेतकरी बेपत्ता असल्याचे समजते.
संततधार बरसणाऱ्या पावसाने संगमेश्वर बाजारपेठेत शात्री व सोनवी नदीचे पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ातील सर्वच तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह
कोसळणाऱ्या पावसामुळे झाडे, घरे, गोठे आदींचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीच्या पातळीत वाढ होत असल्याने रहिवाशांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मासेमारी बोट भरकटली
ताशी ५० ते ६० कि. मी. वेगाने वारे वाहत असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा मच्छीमारांना देण्यात आला होता. तरीही काही मच्छीमार समुद्रात गेले होते.
मिरकरवाडा येथील उमर शमसुद्दीन होडकर यांची ‘हाजी इस्लामी’ ही नौका मासेमारी करून परतत असताना जोरदार वारा व खवळलेल्या समुद्रामुळे या नौकेला वरवडे-आंबूवाडी किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आले होते. परंतु लाटांच्या जबरदस्त माऱ्यामुळे नागराचा दोर
तुटला व ही नौका खडकावर जाऊन आदळली. नौका बुडणार अशी अवस्था निर्माण झाल्याने त्यावरील सर्व सात खलाशांनी पाण्यात उडय़ा घेतल्या व ते पोहतच किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले. मात्र यात त्या मासेमारी बोटीचे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आजही कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे.