मुंबई-गोवा महामार्ग बुधवारी दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे बराच काळ रात्री बंद होता, तर तिकडे आंबोलीच्या पर्यटनस्थळी गेळे येथे  नदीला महापूर आल्याने तीन गाडय़ा अडकल्या होत्या. मात्र, पोलिसांनी मध्यरात्री पर्यटकांना सुखरुप बाहेर काढले.
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर भंगसाळ, पीठढवळ व बेल नदींना महापूर आला होता. तीनही नद्यांना टप्प्याटप्प्याने पूर आला असल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरळीत करण्यात आली. मात्र, या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची धांदलच उडाली. मध्यरात्री प्रवास करणाऱ्यांना पर्यायी मार्गाची जाणीव नव्हती.
जिल्ह्य़ातील अनेक नद्यांना ठिकठिकाणी महापूर आला होता. सह्य़ाद्रीच्या पट्टय़ात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे आंबोलीसारख्या पर्यटन स्थळ असणाऱ्या गेळे गावातील नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पर्यटकांच्या गाडय़ा पलीकडे अडकल्या होत्या. हा प्रकार बुधवारी रात्री घडला होता. या प्रकारामुळे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पर्यटक प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले. अखेर मध्यरात्री पाणी कमी झाले. आंबोली-गेळे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील पीठढवळ, गेळ, भंगसाळ नद्यांना बुधवारी रात्री पाणी आल्याने वाहतूकीचा चार-पाच तास खेळखंडोबा उडाला.जिल्ह्य़ात सरासरी ८२.६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधीक १९२ मि.मी. दोडामार्ग तालुक्यात, तर सावंतवाडी तालुक्यात १४० मि.मी. व कणकवली तालुक्यात १०३ मि.मी. एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. दऱ्याखोऱ्यात पाऊस कोसळल्याने पर्जन्यमान नोंद होण्यास अडथळे आले.