तरण्याचा कोळसा झाला असताना म्हाताऱ्याने चांगलेच बाळसे धरले असून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. कोयना व चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस जोरदार पाळस होत असून गुरुवापर्यंत धरणातील पाणीसाठा ४४ व २५ टीएमसी होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे. कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात नवजा येथे बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत २४४ मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. शिराळ्यात सकाळी ८ वाजेपर्यंत ९१ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला असून वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चिकुर्डे मांगले पुलाला पाणी टेकले असून या मार्गावरील रस्ता वाहतूक बंद पडण्याच्या स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यातील पहिली तीन नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर चार दिवसांपासून सुरू झालेल्या पुनर्वसू म्हणजे म्हाताऱ्या नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यात सलग तीन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत असल्याने कोकरूड, रेठरे पूल पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदीवरील शिगाव, दुधगाव, समडोळी आणि कृष्णा नदीवरील सांगली, म्हैशाळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथील बबन चौगुले यांचे घर मुसळधार पावसाने कोसळले. गावातील काही घरांची संततधार पावसाने पडझड झाली आहे.
पश्चिम भागात मुसळधार तर पूर्व भागात मोठय़ा सरी थांबून थांबून होत असल्याने ओढे, नाल्यांना मोठय़ा प्रमाणावर पाणी आले. रानातही भिज पाऊस झाल्याने कोळपण व भांगलणीची कामे ठप्प झाली आहेत. भात, सोयाबीनसह हंगामशीर पेरणी झालेल्या खरीप पिकांची स्थिती चांगली आहे.
जिल्ह्यात तालुका स्तरावर बुधवारी सकाळी नोंदला गेलेला पाऊस असा, सांगली ३५ मिमी., मिरज ३९, तासगाव ३२, शिराळा ९१, विटा २०, आटपाडी १७, कवठेमहांकाळ २१.३, जत १३.५ आणि कडेगाव ३८ मिलिमीटर एवढा असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून आज देण्यात आली.