मृग नक्षत्रापासून पावसाने शानदार सलामी दिली असतानाच गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वाचाच गोंधळ उडाला. कालपासून सतत पाऊस कोसळत असून जिल्ह्य़ात ८८५ मि. मी. एवढा एकूण पाऊस कोसळला असून त्याची सरासरी १०३.१२ एवढी आहे. सिंधुदुर्गात कोसळणारा पाऊस मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला सलामी देऊन गायब झालेला नाही. तो सतत कोसळत आहे. काल अमावास्या असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे बंद ठेवली होती, पण आज मुसळधार पाऊस कोसळत असतानाही शेतीची कामे सुरू झाली आहेत. ग्रामीण भागात खड्डेमय रस्त्यात गटाराचे पाणी व गाळ साचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गाडी चालविणे तारेवरची कसरत ठरली आहे. सावंतवाडी तालुक्यात आज मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे नदीनाल्यांना पाणी आले. ओहोळ दुथडी भरून वाहत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सावंतवाडी तालुक्यात १४३ मि.मी. एवढा विक्रमी पाऊस दुसऱ्या दिवशीही नोंदला गेला. सावंतवाडीनंतर वेंगुर्ले तालुक्यात १३७ मि.मी., वैभववाडी १३२ मि.मी., देवगड ११५ मि.मी., कणकवली ८८ मि.मी., मालवण ९९ मि.मी. व दोडामार्ग ६५ मि.मी. एवढा पाऊस नोंदला आहे. जिल्ह्य़ात एकूण ८८५ मि.मी. म्हणजेच सरासरी १०३.१२ एवढा पाऊस नोंदला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. शिवाय पाऊस थोडा गायब झाल्यावर उष्णताही वाढत आहे. या पावसामुळे हवेत अद्यापि गारवा निर्माण झालेला नाही. या पावसाचा शेतकरी वर्गाला फायदा झाल्याचे सांगण्यात येते.
भातशेतीसाठी तरवा पेरणी अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. काही तुरळक भागांत तरवा पेरणी बाकी आहे. मात्र या पावसामुळे तरवा पेरणी शक्य नाही असे समजले.