मान्सूनने यावर्षी पाठ फिरवल्यानंतर बंगालच्या खाडीकडून येणाऱ्या वाऱ्यांकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, या वाऱ्यांनीही आणि पाठोपाठ पावसानेसुद्धा पाठ फिरवली. मात्र, परतीच्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून विदर्भात चांगलाच जोर धरला आहे. गडचिरोली जिल्ह्याला या पावसाचा जोरदार फटका बसला असून नाल्यात दोन जण वाहून गेले, तर सुमारे पाचशे घरांची पावसामुळे पडझड झाली. गेल्या तीन दिवसांपासून विदर्भात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, अमरावती, अकोला आदी शहरातही पावसाची संततधार सुरूच आहे. त्यापैकी चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसामुळे एका वाहनासह दोन जण वाहून गेल्याच्या, तर काही घरांची पडझड आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचाजवळ करसपल्ली नाल्यात टाटा सुमोसह एक जण वाहून गेला, तर याच मार्गावरील गोमणी नाल्यातसुद्धा एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. पावसामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पर्लकोटा, इंद्रावती, कठाणी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चंद्रपूर शहरातही वडगाव, सिस्टर कॉलनी आदी भागात पाणी शिरल्याच्या घटना आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. दारव्हा आणि दिग्रस तालुक्यचात अनेक घरांची पडझड आहे. अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असून, नुकसानीची मात्र एकही घटना नाही.