कोकणात रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीतील शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आल्याचे समजते. तर आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्याजवळ एक मच्छिमारी बोट बुडाल्याची घटना घडली. तटरक्षक दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बोटीतील सात मच्छिमारांचे प्राण वाचवले.

मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कायम असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीतील शाळांना पावसामुळे सुट्टी देण्यात आल्याचे समजते. या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील भेडशी, कुडाळ तालुक्यातील आंबेरी व शिवापूर, मालवण तालुक्यातील मालवण-बागायत, कांदळगाव-मसुरे, कसाल-वायंगवडे मार्गावरील रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद आहे. कोकणातील रस्ते वाहतुकीच्यादृष्टीने हे मार्ग महत्त्वाचे आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील पिट ढवळ पुलावरही पुराचे आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, पर्यायी मार्गावरुन वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे.

कोकणासह मुंबई आणि उपनगरातही दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. दक्षिण मुंबईत ढगांच्या गडगडाटांसह पाऊस झाला. दादर, वांद्रे आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पावसानंतर रेल्वे सेवा सुरळीत असली, तरी मध्य रेल्वे मार्गावर थोड्या प्रमाणात परिणाम झाला आहे. या मार्गावरील गाड्या ५ ते १० मिनिटे उशिरा धावत आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा जोर दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यासह धरण परिसरात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरणाचे सर्व सात ही स्वंयचलित दरवाजे उघडले असून १२ हजार २०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागासह धरणक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळं जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरण ९० टक्के भरले असून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी १९९० आणि २००६ मध्ये जायकवाडी धरणातून लाखो क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडल्यामुळे पैठण तालुक्यातील ४७ गावांसह बीड, जालना, परभणी, नांदेड जिल्ह्य़ातील शेकडो गावात पूर परिस्थितीने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. यावर्षी देखील आशाच पूर स्थितीचे संकट गोदाकाठावरच्या गावांसमोर घोंगावताना दिसत आहे.