रायगड जिल्ह्य़ात सलग तिसऱ्या महिन्यात पावसाने सरासरीचा टप्पा गाठला आहे. जिल्ह्य़ात जून महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के, जुल महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या १०४ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी ३ हजार १४२ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. या तुलनेत या वर्षी आतापर्यंत २ हजार ९४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण एकूण वार्षकि सरासरीच्या ९४ टक्के एवढे आहे. मात्र जून, जुल आणि ऑगस्ट महिन्यांतील पावसाच्या सरासरीचे प्रमाण लक्षात घेतले तर ते १०० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्य़ात जून महिन्यात सरासरी ६८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर जुल महिन्यात सरासरी १ हजार ३४० मिमी पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरी ९२३ मिमी पाऊस झाला आहे.

या वर्षी सर्वाधिक पावसाची नोंद रोहा तालुक्यात झाली आहे. इथे ३ हजार ५६९ मिमी पाऊस पडला आहे. उरण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे १ हजार ८५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ातील इतर भागांच्या तुलनेत कर्जत आणि खालापूर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. या दोन तालुक्यांत सरासरी पावसाच्या ७० टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्य़ात सर्वत्र पावसाचा जोर अजूनही कायम आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात पाऊस तीन हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्य़ातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत २४ छोटी धरणे आहेत. यातील बहुतांश धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे या वर्षी पाणीटंचाईची समस्या फारशी जाणवणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुबलक पावसामुळे शेतीची परिस्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत. शेतीतून या वर्षी चांगले उत्पन्न मिळण्याची आशा त्यांना आहे.