गेल्या २४ तासात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस देवगड तालुक्यात १४६ मि.मी. एवढा नोंदला गेला आहे. त्या खालोखाल ९५ मि.मी. मालवण तालुक्यात नोंदला असून समुद्र किनारपट्टी भागात पावसाचा जोर या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे निश्चितच नदीनाल्यांना पाणी वाहू लागणार आहे. काही ठिकाणी पूरही येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या चौवीस तासात आठही तालुक्यात सरासरी ६२.७८ मि.मी. एवढा पाऊस नोंदला आहे. जिल्ह्य़ात १ जूनपासून आजपर्यंत सरासरी ५८४.९८ मि.मी. एवढा पाऊस नोंदला आहे.

सिंधुदुर्गात आठही तालुक्यात मि.मी.मध्ये गेल्या २४ तासात सकाळी ८ वाजता नोंदलेला पाऊस- देवगड १४६, मालवण ९५, दोडामार्ग ७३, वेंगुर्ले ५२, सावंतवाडी ४३, कणकवली ३८, कुडाळ ३७, वैभववाडी १८ एवढा नोंदला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कोसळणाऱ्या या पावसामुळे भातशेती लागवड करणाऱ्यांना फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी तरवा पेरणी केली आणि भातरोपे आली त्यांना निश्चितच भातरोपे लागवडीसाठी हा पाऊस पुरक व समाधानकारक आहे असे कृषी विभागाने म्हटले आहे.

यंदा पावसाच्या हंगामाच्या हुलकावणीमुळे नदी-नाल्यांना पूर येईल तेव्हाच पाणी शेतीसाठी उपयुक्त ठरेल असे सह्य़ाद्रीच्या पट्टय़ातील शेतकऱ्यांना वाटते.

शेतीसाठी पुरक मानला जाणारा हा पाऊस कोसळत राहीला तरच शेतीला उपयुक्त ठरेल, अन्यथा भातशेतीचे क्षेत्र घटेल. गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता पावसाच्या लहरीपणाचा फटका भातशेतीवर होत असल्याचे सिंधुदुर्ग ऑरगेनीक फॉर्मर्स फेडरेशनचे अध्यक्ष अमोल टेबकर यांनी म्हटले आहे.