शुक्रवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे गणेशभक्तांना गणरायाला घरी नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अवघ्या काही तासात विक्रमी पावसाची नोंद झाल्यामुळे शहरातील रस्ते व सखल भागातून अक्षरश: पाण्याचे लोट वाहत होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिला. गोदावरीच्या काठावरील अनेक भागही जलमय झाले.
गणपतीच्या स्वागतासाठी सकाळपासून गणेशभक्तांची धावपळ सुरू होती. ढगाळ वातावरण असल्याने पाऊस हजेरी लावेल असा अंदाज होता. पण, त्याची हजेरी इतकी दमदार असेल, याची कल्पना कोणी केली नाही. दुपारी बाराच्या सुमारास बहुतांश भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे गणेशभक्तांना मूर्ती घरी घेऊन जाणे अवघड बनले. ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये शेकडो गणेशभक्त पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करत बसले. दीड तासात विक्रमी पाऊस झाला. यामुळे बहुतांश रस्ते पाण्याखाली बुडाले. सर्वत्र पाण्याचे लोट वाहत असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली. सायंकाळी पुन्हा याच पध्दतीने त्याने हजेरी लावून गणेशभक्तांची तारांबळ उडवून दिली. प्रमुख रस्ते, गोदावरी काठालगतचा परिसर व शहरातील सखल भाग जलमय झाले. पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे.