अनेक दिवसांपासून शेतकरी ज्याची चातकासारखी वाट पाहात होते त्या पावसाने विदर्भात सर्वदूर गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र हजेरी लावली आहे. झडीच्या प्रतीक्षेत असलेल्या वऱ्हाडवासीयांना यंद प्रथमच संततधार पहायला मिळत असून पश्चिम विदर्भात सर्वदूर हलक्या ते मध्यम सरींनी वातावरण बदलले आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्य़ांमध्येही सलग तीन दिवसापासून संततधार सुरू असून भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शंभर गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पावसामुळे चंद्रपुरात पेरण्यांना वेग आला आहे.
नागपूर जिल्ह्य़ात या पावसाळ्यात सरासरीच्या ७५ टक्के पाऊस पडला असून नागपूर ग्रामीण, काटोल व कळमेश्वर तालुक्यांत सरासरी ओलांडली आहे. नागपूर शहरात ४२.२ मि. मी पाऊस पडला. अनेक वर्षांनंतर सलग तिसऱ्या दिवशी पावसाची झड लागली आहेत. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यानंतर शेतक ऱ्यांची चिंता वाढली होती. जुलैचा पहिला पंधरवडय़ातही कोरडा गेल्याने चिंतेत आणखी भर पडली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. यावर्षी आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नागपूर ग्रामीण तालुक्यात पडला आहे.  चंद्रपूर व गडचिरोलीत शनिवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने शंभर गावांचा संपर्क तुटला आहे. भामरागड, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी व धानोरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे. गडचिरोलीत आतापर्यंत ७०० मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली आहे. केवळ पर्लकोटाच नाही, तर वैनगंगेतही पाणी आले आहे. त्यामुळे अनेक गावातील वीज पुरवठा सुध्दा खंडीत झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला हा पाऊस आजही सुरू होता. यामुळे जिल्ह्य़ातील ११ मध्यम सिंचन प्रकल्प भरू लागले आहेत, तर वर्धा, वैनगंगा, ईरई, झरपट व पैनगंगा या नद्यांनाही पाणी दिसत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतांमध्ये पेरण्यांना वेग आलेला आहे. नदी काठावरील गावकऱ्यांना सतर्ककेचा इशारा देण्यात आलेला आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, सिंदेवाही, चिमूर, ब्रम्हपुरी व नागभीड या तालुक्यात पावसाचा जोर चांगला असल्याने धान पेरण्यांनी वेग घेतला आहे. असाच पाऊस राहिला तर आठवडाभरात जिल्ह्य़ातील सर्व सिंचन प्रकल्प तुडंब भरले जातील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ३३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांमध्ये ६.३ मि.मी. पावसाची नोंद झाली. जूननंतर जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पावसाने शेतकऱ्यांची परीक्षा घेतली. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने धोक्याची घंटा वाजली. अखेरीस गेल्या काही दिवसांपासून बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे हाती घेतली. आतापर्यंत केवळ ११३ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ३३ टक्के पाऊस झाला असला तरी तो दिलासादायक ठरला आहे.
अमरावती जिल्ह्य़ात १ जूनपासून आतापर्यंत १९४ मि.मी. (सरासरीच्या ५७ टक्के), अकोला जिल्ह्य़ात ८० मि.मी. (२७ टक्के), बुलढाणा ७० मि.मी. (२४ टक्के), वाशीम ११० मि.मी. (३२ टक्के), तर यवतमाळ जिल्ह्य़ात ९८ मि.मी. (२३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अमरावती विभागात केवळ धामणगाव रेल्वे तालुक्याने पावसाची सरासरीइतका ३२१ मि.मी. (१०१ टक्के) पाऊस आतापर्यंत झाला आहे. तिवसा व अंजनगाव सुर्जी वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये पाऊस पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. अकोला जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ३० टक्क्यांच्या खाली आहे. सर्वाधिक पाऊस होणाऱ्या धारणी व चिखलदरा तालुक्यातही ४० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यात तर केवळ ७ टक्केच, तर  दिग्रस, पुसद, मोहगाव व बुलढाणा जिल्ह्य़ातील मोताळा व नांदुरा या तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ १५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.