मेडिकल रुग्णालय परिसरात हेलिपॅड बांधणे अशक्य असून बंद असलेली रक्त संकलन व्हॅन नॅकोकडून अनुदान मिळाल्यानंतरच सुरू होणार असल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख व कृष्णा खोपडे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांवर विधानसभेत शुक्रवारी लेखी उत्तरे देण्यात आली. रक्त संकलन करणारी दीड कोटी रुपये किमतीची ब्लड मोबाईल व्हॅन एक वर्षांपासून नॅको या संस्थेकडून मिळणारे अनुदान थांबल्याने व डिझेलअभावी बंद असून रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. इमारत निधीअभावी फर्निचर व संगणक नसल्याने तेथील ई-ग्रंथालयाचा उपयोग होत असल्याचे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.
केंद्र शासनाच्या नॅको संस्थेतर्फे अनुदान प्राप्त होताच ही व्हॅन सुरू केली जाईल. ई-ग्रंथालय नागरिकांसाठी नसून त्या इमारतीचा वापर सुरू आहे. तेथे फर्निचर व संगणक खरेदी प्रक्रिया सुरू आहे. मेडिकल रुग्णालय परिसरात ११ कोटी ६० लाख रुपये खर्चून ट्रॉमा सेंटर बांधले जात असून मार्च २०१५ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सेंटरसाठी आवश्यक ३०१ पदे मंजुरीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून तो मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे. ईमारत कार्यान्वित होईपर्यंत पदनिर्मिती केली जाईल, असे लेखी उत्तर वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.  
गडचिरोली जिल्ह्य़ातील नक्षलवादी हल्ल्यातील जखमी जवानांसाठी तातडीने उपचार मिळावा, यासाठी तेथे शासनाच्या सामान्य रुग्णालयात सहा खाटांची सुसज्य अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाला आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली व बंगळुरूच्या धर्तीवर शासकीय रुग्णालयाच्या परिसरात हेलिपॅड तयार करण्याचा प्रस्ताव नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला होता.