सोलापूरचे धडाकेबाज पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी रुजू झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यात पोलीस प्रशासनाचा दर्जा सुधारत गुणवत्ता वाढवताना कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हाती घेतली आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसत असताना त्यांनी वाहतुकीला हळूहळू शिस्त लावण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापरण्याचे बंधन घालण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु नागरिकांना काहीसा विरोध दिसू लागताच त्यांच्या भावना समजून घेत सेनगावकर यांनी हेल्मेट वापरण्याचे बंधन शिथिल केले आहे.
हेल्मेटच्या सक्तीपेक्षा नागरिकांनी स्वत: वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. हेल्मेटची सक्ती करणार नाही. परंतु स्वत:च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हेल्मेट वापरणे अपेक्षित आहे. त्यात पोलीस प्रशासन सक्ती करणार नसल्याची भूमिका पोलीस आयुक्त सेनगावकर यांनी जाहीर केली. त्यामुळे हेल्मेट वापरण्याच्या नियमाची सक्तीने अंमलबजावणी होणार नसल्यामुळे वाद होण्यापूर्वीच त्यावर पडदा पडला आहे. दरम्यान, शिवसेना व अन्य काही मूठभर संघटनांचा अपवाद वगळता हेल्मेट सक्तीला नागरिकांचा तितकासा तीव्र विरोध नाही. शिवसेनेने हेल्मेटच्या वापराला तीव्र विरोध केला आहे. यापूर्वी २००५ साली प्रथमच दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्याची सक्ती लादण्यात आली होती. त्या वेळी हेल्मेट वापरण्यामागचा हेतू समजून न घेता त्यास मोठय़ा प्रमाणात विरोध झाला होता. त्यासाठी तत्कालीन महापौर विठ्ठल करबसू जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मोर्चाही काढला होता. त्यानंतर सर्वत्रच हेल्मेट सक्ती मागे पडली होती. मात्र आता नवे पोलीस आयुक्त सेनगावकर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच हेल्मेटचा वापर करण्याचे बंधन घालणार असल्याचे व त्याची अंमलबजावणी बुधवारी, १ जुलैपासून होणार होती. सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरात दोन लाख ४० हजारांपेक्षा जास्त दुचाकी वाहने आहेत.
पोलीस आयुक्तांच्या या आवाहनाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत नागरिकांनी हेल्मेटची खरेदी करणेही सुरू केले होते. हेल्मेट वापरण्याचे महत्त्व नागरिकांना कळू लागल्यामुळे त्यास पूर्वीसारखा विरोध राहिला नाही. तरीदेखील पोलीस आयुक्त सेनगावकर यांनी यासंदर्भात कठोर भूमिका न घेण्याचे ठरवले आहे. मात्र नागरिकांना फारसे न दुखावता हेल्मेटचा वापर होण्यासाठी टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले जातील. त्यासाठी संवाद वाढवून लोकप्रबोधन केले जाईल, असे सेनगावकर यांनी नमूद केले.