राजकारणात एखाद्याने पक्षांतर करणे ही बाब आता इतकी सर्वमान्य झाली आहे की त्यामुळे कोणी नाराज झाल्यास तो दुसऱ्या पक्षाचे दार ठोठावणार, हे सामान्य जनताही ओळखू लागली आहे. परंतु ३० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेसारख्या कट्टर पक्षात व्यतित केलेली सुनील बागूल यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा हकालपट्टीनंतर राजकीय आधार शोधण्यासाठी आपल्या स्वभाव गुणांविपरित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते, तेव्हा त्यामागील अनेक पदर उलगडणे आवश्यक ठरते.
जिल्हा शिवसेनेत सुनील बागूल यांनी एका सामान्य कार्यकर्त्यांपासून जिल्हाप्रमुख पदापर्यंत केलेली प्रगती नक्कीच विस्मयचकित करणारी. बागूल यांनी आपली आक्रमक व लढाऊ स्वभाव वृत्ती पक्ष कार्यासाठी वापरतानाच रिक्षा, टेम्पो, चालक व वाहकांसाठी श्रमिक सेनेच्या माध्यमातून संघटन तयार करत स्वत:ची एक वेगळी ताकद निर्माण केली. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातही याच सेनेच्या आधारे स्वत:चा दबदबा निर्माण केला. त्यामुळेच शिवसैनिकांव्यतिरिक्त हजारोंचे पाठबळ असलेले जिल्हा शिवसेनेतील ते एकमेव नेते ठरले. या पाठबळाचा वापर त्यांनी विविध प्रसंगी वेळोवेळी करून घेतला. ममता दिनी झालेल्या वादाचे निमित्त होऊन शिवसेनेतून हकालपट्टी ओढवून घेतल्यानंतरही आणि कार्याध्यक्षांनी संक्रांतीनंतर म्हणणे ऐकून घेण्याचे आश्वासन मध्यस्थांना देऊनही याच पाठबळाच्या आधारावर त्यांनी त्याआधीच मेळावा घेण्याचे धारिष्टय़ दाखविले.
राजकारणात केव्हा, कोणता निर्णय घ्यावा, केव्हा संताप व्यक्त करावा आणि केव्हा माघार घ्यावी, ही ‘के’ची बाराखडी आत्मसात केलेली व्यक्ती इतरांपेक्षा अधिक यशस्वी होऊ शकते असे म्हणतात. कार्यकर्ते व समर्थकांच्या आग्रहामुळे आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे बागूल यांनी म्हटले असले तरी त्यांच्या बरोबर ममता दिनाच्या वादात प्रारंभी राहून नंतर सावध भूमिका घेतलेल्यांनी अगदी एका दिवसात पुन्हा नव्या पदाधिकाऱ्यांबरोबर जुळवून घेतल्याचे सूरही बागूल यांच्या कानी पडले असतीलच. मुळात शिवसेना रोमारोमात भिनलेली असल्याने हकालपट्टीनंतर एकदमच अस्वस्थ झालेल्या बागूल यांनी परतीचे दोर कापण्यात आल्यामुळे केवळ नाईलाज म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे मानले जात आहे. ममता दिनाच्या वादानंतर मध्यस्थांनी केलेल्या शिष्टाईस मान देऊन कार्याध्यक्षांनी भावना जाणून घेण्याची तयारी दर्शविल्यानंतरही बागूल यांनी मेळावा घेत एकप्रकारे पक्ष नेतृत्वालाच आव्हान दिले. त्यामुळे चर्चेचा दरवाजा बंद करण्यावाचून शिवसेनेपुढेही मार्ग उरला नाही.
‘कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांची संख्या अधिक’ असे ज्या राष्ट्रवादीविषयी म्हटले जाते त्या पक्षास बागूल यांच्या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांचा काही प्रमाणात लाभ होणार असला तरी बागूल यांना नक्की काय मिळेल ते अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेप्रमाणे त्यांचे श्रमिक सेनेसारखे  ‘स्वतंत्र संस्थान’ राष्ट्रवादीत खपवून घेतले जाईल काय, हाही प्रश्नच आहे. अन्यथा राष्ट्रवादीतील अगणित नेत्यांपैकी एक अशी ओळख होणे त्यांना भविष्याच्या दृष्टीनेही परवडणारे नाही. ज्या नवीन पदाधिकाऱ्यांमुळे आपल्यासारख्या ज्येष्ठांवर अन्याय झाल्याची भावना शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये ‘संक्रमण’केलेले सुनील बागूल यांनी व्यक्त केली, तीच भावना त्यांना जर महत्वपूर्ण पद मिळाले तर राष्ट्रवादीतील ज्येष्ठांकडूनही व्यक्त होऊ शकते. या ज्येष्ठ नेत्यापुढे तेच एक मोठे आव्हान राहणार असून हे आव्हान स्वीकारून राजकारणाच्या भिन्न संस्कृतीशी ते कशा प्रकारे मिळतेजुळते घेतात, यावर  राष्ट्रवादीतील त्यांची पुढील वाटचाल अवलंबून राहील.