केंद्रातील मोदी सरकारकडून संवाद होत नसल्यामुळे काश्मीरचा प्रश्न चिघळत आहे. तेथे दररोज लष्कराच्या जवानांचे बळी जात आहेत. संवाद न करता दिल्लीत बसून काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही, असे परखड मत काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय गृहमत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

कवी रा. ना. पवार प्रतिष्ठानने आयोजिलेल्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या या सोहळ्यात कृष्णाबाई नारायण सुर्वे, मुंबई (मास्तरांची सावली-आत्मकथन), प्रा. डॉ शिवाजीराव देशमुख, सोलापूर (शैलीदार यशवंतराव-यशवंतराव चव्हाणांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा ग्रंथ), कल्पना दुधाळ, दौंड (धग असतेच आसपास-काव्यसंग्रह) व इंद्रजित घुले, मगळवेढा (या वेशीपासून त्यावेशीपर्यंत-काव्यसंग्रह) यांच्या साहित्यकृतींना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कवी रा. ना. पवार साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे कार्यवाह पुरूषोत्तम सदाफुले-पाटील हे अध्यक्षस्थानी होते. संयोजक कवी माधव पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

काश्मीरमध्ये धुमसत चाललेल्या परिस्थितीचा वेध घेताना शिंदे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारला काश्मीरच्या प्रश्नावर तेथील जनतेशी संवाद साधता येत नसल्यानेच तेथील परिस्थिती चिघळली आहे. यापूर्वी काँग्रेस सत्तेवर असताना इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून ते डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांनी काश्मीर प्रश्नावर सतत संवाद ठेवला होता. चीन युध्दानंतर पुढे राजीव गांधी यांनी चीनबरोबरचे संबंध सुधारले, तर इंदिरा गांधींनी बांगलादेशाची निर्मितीसाठी हातभार लावला व पाकशी युध्द झाल्यानंतर पुढे संवाद चालूच ठेवत पाकचे दिवंगत तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकारअली भुट्टो यांच्याबरोबर सिमला करार घडवून आणला. शेवटी संवाद महत्त्वाचा आहे. मात्र मोदी सरकार याकामी उदासीन आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. कृष्णामाई नारायण सुर्वे यांनी प्रकट मुलाखतीद्वारे मनोगत मांडले. तर डॉ. शिवाजीराव देशमुख यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकताना हा पुरस्कार म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा बहुमान असून आपण केवळ निमित्तमात्र आहोत, अशी भावना व्यक्त केली. इंद्रजित घुले यांनी कविता सादर करून आपल्या प्रतिभेचा परिचय करून दिला. तर कल्पना दुधाळ यांनी आपल्या एकत्रित कुटुंब पध्दतीत जीवन जगताना व शेतीशी संबंधित हजारो कामे डोळे वटारून पाहात असताना कुटुंबीयांनी आपणास कवितेसाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. यावेळी पुरूषोत्तम सदाफुले-पाटील व प्रा. डॉ.श्रीकांत येळेगावकर यांचीही भाषणे झाली. मसापच्या अ. भा. मराठी संमेलन स्थळनिश्चिती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पद्माकर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. नभा काकडे यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभास माजी आमदार प्रकाश यलगुलवार, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे, ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख, ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने, कादंबरीकार सुरेखा शहा आदींची उपस्थिती होती.