एचआयव्ही एड्ससारख्या आजारासंदर्भात शासनाकडून केल्या जात असलेल्या जनजागृतीचे आता सकारात्मक परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ात एचआयव्हीसाठी होत असलेल्या तपासण्यांचे प्रमाण वाढले असले तरी लागण होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटले आहे.
रायगड जिल्ह्य़ातील मागील १० ते १२ वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर या बाबी प्रकर्षांने समोर येतात. सन २००२ मध्ये जिल्ह्य़ात १३८ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली त्यापकी ५८ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे समोर आले. हे प्रमाण ४२ टक्के होते. २००३ मध्ये ५४५ जणांची चाचणी करण्यात आली त्यापकी १४७ जण एचआयव्ही बाधित निघाले. त्यांचे प्रमाण २७ टक्के इतके होते. पुढे दरवर्षी चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
मात्र बाधितांचे प्रमाण घटत असल्याचे दिसून येते. अगदी २०१४ मध्ये एचआयव्ही चाचणी करणाऱ्यांची संख्या ४८ हजार ७७३ पर्यंत पोहोचली त्यापकी अवघ्या ४३७ जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. हे प्रमाण केवळ १ टक्क्याच्या आसपास आहे.
रायगड जिल्ह्य़ात १५ ठिकाणी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय अगदी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही एचआयव्ही चाचणी करण्यात येते. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय आणि रसायनी लोधिवली येथील धीरुभाई अंबानी रुग्णालय अशा दोन ठिकाणी उपचार केले जातात. विशेष म्हणजे एड्स बाधितांच्या बाबतीत राज्यातील अन्य जिल्ह्य़ांशी तुलना केल्यास रायगड जिल्ह्य़ाचा शेवटून तिसरा क्रमांक लागतो.