चार वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत १६६ निरपराधांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी जिवंत हाती लागलेला लष्कर-ए-तोयबाचा एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला बुधवारी सकाळी सव्वासात वाजता पुण्याच्या येरवडा कारागृहात फासावर लटकावण्यात आले आणि मुंबईसह उभ्या देशाने समाधानाचा नि:श्वास टाकला. गेली चार वर्षे मुंबईच्या काळजावरील भळाळती जखम होऊन राहिलेला आणि कोटय़वधी रुपये खर्चाच्या सरबराईतून सरकारी पाहुणचार घेणाऱ्या कसाबला दयामाया न दाखविता त्याच्या क्रूरकर्माचा बदला घेऊन मुंबईच्या भळभळत्या जखमेवर सरकारने मलमपट्टी चढविली. अत्यंत गुप्तपणे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडलेल्या या ‘ऑपरेशन एक्स’मुळे, भारत हा दहशतवाद्यांचे नंदनवन असल्याच्या समजुतीला सणसणीत चपराक मिळाली असून, जगभरात देशाची कर्तव्यकठोर प्रतिमा उजळली आहे.
येरवडा कारागृहात, अत्यंत गोपनीयतेत आणि न्यायाधीश, तहसीलदार, डॉक्टर, कारागृहाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत कसाबला बुधवारी सकाळी ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटे आधीच, सव्वासात वाजता फाशी देण्यात आली. त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला शेवटची इच्छा विचारण्यात आली. त्यावर त्याने कोणतीही इच्छा नसल्याचे सांगितले. मात्र त्याने ‘अल्ला कसम ऐसी गलती दुबारा नही होगी’ असे पुटपुटत पश्चात्ताप व्यक्त केला, असे सांगण्यात येते. जल्लादाच्या गैरहजेरीत कारागृहातील कर्मचाऱ्यानेच खटका ओढून कसाबलाफाशी दिली. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह कारागृहातच दफन करण्यात आला. कसाबला घेऊन आलेल्या पथकातील अधिकाऱ्यांना कसाबला फाशी देऊन दफन करेपर्यंत कारागृहाच्या बाहेर सोडण्यात आले नव्हते. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यावर लगेचच हे वृत्त दूरचित्रवाणी वाहिन्यावरून देशभर पसरले. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला आणि मुंबईसह अवघ्या देशात कसाबच्या फाशीचा जल्लोष साजरा होऊ लागला.
अशी झाली फाशीची तयारी
येरवडा कारागृहात कसाबला आणल्यानंतर फाशी देण्याच्या नियमानुसार कसाबच्या वजनाएवढे वजन दोराला बांधून चाचणी घेण्यात आली. कसाबच्या फाशीसाठी वापरण्यात येणारा दोर हा लोण्यामध्ये ठेवण्यात आला होता. काही मिनिटे अगोदर कसाबला फाशी द्यायचे असल्याचे त्याला सांगण्यात आले.
कारागृह कर्मचाऱ्यानेच दिली फाशी
जल्लाद नसल्यामुळे दहशतवादी अजमल कसाब याला येरवडा कारागृहातील एका कर्मचाऱ्यानेच खटका ओढून फाशी दिली. विशेष म्हणजे याबाबत इतकी गोपनीयता पाळण्यात आली होती की, फाशी देण्याच्या काही मिनिटे अगोदपर्यंत त्या कर्मचाऱ्यास आपण कोणाला फाशी देणार याची माहिती नव्हती.
कमालीची गुप्तता ..
कसाबच्या फाशीच्या अंमलबजावणीचा आराखडा अत्यंत गुप्तपणे आखण्यात आला. कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी त्याला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविण्यात आले, पण त्याला तेथे घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही गुप्ततेची कठोर बंधने होती. बुधवारी सकाळी कसाब फासावर लटकल्यानंतरच ही बातमी जगाला समजली. तथापि, आधीपासूनच या अंमलबजावणीची आखणी अतिशय काळजीपूर्वक सुरू होती. गेल्या ५ नोव्हेंबरला राष्ट्रपतींनी कसाबचा दयेचा अर्ज फेटाळला, तसे महाराष्ट्र सरकारला कळविण्यात आले व अंमलबजावणीचा आराखडा तयार होऊ लागला. कसाबच्या फाशीचा आदेश तयार झाला आणि कसाब कोणत्याही स्थितीत फासावर लटकणार हेही स्पष्ट झाले..
शेवटची इच्छा, आईला निरोप..
फाशी देण्याआधी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. कसाबलाही फाशीची पूर्वकल्पना १२ नोव्हेंबरलाच दिली गेली होती आणि त्याची शेवटची इच्छाही विचारली गेली होती. ‘माझ्या अम्मीला (मला फाशी दिल्याचे) सांगा’, ही त्याची अखेरची इच्छा होती. नूरी लाइ ही कसाबची आई असून तिच्याइतके कुणीही त्याच्या जवळचे नव्हते. फाशीबाबतचे सोपस्कार पूर्ण होताच गृहसचिव आर. के. सिंग यांनी परराष्ट्र सचिव राजन मथाई यांना कसाबच्या आई व इतर नातेवाईकांना फाशीची माहिती कळविण्यास सांगितले. त्यानुसार मंगळवारीच इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातर्फे कसाबच्या आईला कुरियरने कळविले गेले आणि कसाबची अंतिम इच्छा पूर्ण केली गेली.

‘ऑपरेशन एक्स’
*    अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबरला फेटाळल्यावर केंद्र सरकारच्या पातळीवर लगेचच फाशीची शिक्षा अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
*     अजमल कसाब याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र ८ नोव्हेंबरला राज्य शासनास प्राप्त झाले.
*     मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला पाचारण करून कसाबच्या फाशीबाबतची पूर्वकल्पना देण्यात आली.
*     १२ नोव्हेंबरला राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात कसाबच्या फाशीसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गृहसचिव, पोलीस महासंचालक, कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक आदी निवडक अधिकारी उपस्थित. दोन तारखांच्या पर्यायांवर विचार.
*     सोमवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयात झालेल्या बैठकीत कसाबला बुधवारी फाशी देण्याचा अंतिम निर्णय.
*     २२ आणि २३ नोव्हेंबर असे दोन दिवस पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रेहमान मलिक हे भारत भेटीवर येणार होते. पण कसाबच्या फाशीचा निर्णय झाल्यामुळे सोमवारीच संसदेचे अधिवेशनाचे निमित्त करून मलिक यांचा दौरा लांबणीवर टाकण्याची विनंती भारताच्या वतीने पाकिस्तानला करण्यात आली.
*     सोमवारी मध्यरात्री २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे चौकशी अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसाबला पुण्याला हलविले. रात्री साडेबाराच्या सुमारास फोर्स वन, दहशतवादी विरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या सशस्त्र कमांडोंच्या पथकाने ही कारवाई केली. कसाबला पुण्याला नेण्यात येत असताना इंटेलिजन्स ब्यूरोकडून बारकाईने लक्ष. स्कॉर्पिओ गाडीतून कसाबला नेण्यात आले होते. आठ गाडय़ांचा ताफा.
*    मंगळवारी दिवसभर कसाबच्या फाशीची पूर्वतयारी. केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्य सरकारकडून पुन्हा आराखडय़ाच्या अंमलबजावणीचा आढावा.
*    बुधवारी, २१ नोव्हेंबर २०१२ रोजी, सकाळी साडेसात वाजता क्रूरकर्मा कसाब फासावर!