चाळीस वर्षांच्या संघर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात ग्रामविकासमंत्रिपदाची संधी मिळाल्याने विकासाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र मुंडे यांच्या अपघाती निधनाने जिल्हय़ाला मिळालेले सत्तेचे पद हिरावले गेले. त्यामुळे मुंडेंच्या विकासाचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वारस आमदार पंकजा पालवे यांना केंद्रात ग्रामविकास खात्याचे मंत्रिपद द्यावे, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसभेत केली. अनेकांचा मुंडेंच्या आठवणी सांगताना कंठ दाटून आला. पक्षभेद विसरून मुंडे कुटुंबीयाला शक्ती देण्याची ग्वाही अनेकांनी दिली.
 बीड येथे रविवारी चंपावती क्रीडा मंडळाच्या मदानावर गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा झाली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, खासदार रजनी पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, आमदार विनायक मेटे, बदामराव पंडित, महादेव जानकर यांच्यासह अनेक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, चार दशकांच्या संघर्षांनंतर केंद्रात मंत्रिपदाचा सुखाचा क्षण आला असताना काळाने त्यांना हिरावून नेले. प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, समाजाचे मानसशास्त्र जाणणारा नेता, राजकीय मतभेद असले तरी मनभेद न ठेवणारा नेता असे अनेक गुण त्यांच्यात होते. खासदार रजनी पाटील म्हणाल्या, की सर्वाना सोबत घेऊन काम करणारे ते नेते होते. त्यांची राजकीय उंची कोणाला गाठता येणार नाही. रमेश आडसकर म्हणाले, की लोकसभा निवडणूक त्यांच्या विरोधात लढलो, मात्र त्यांनी कधीच कटुता ठेवली नाही. माजी आमदार सय्यद सलीम यांनी पक्षाच्या भूमिकेच्या पुढे जाऊन मुंडेंनी सच्चर समिती, मंडल आयोग, विद्यापीठ नामांतर यासाठी वेगळी भूमिका घेतली. माणुसकीचे नाते जोडणारा असा नेता पुन्हा होणार नाही, या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, माजी आमदार केशवराव आंधळे, नामदेव चव्हाण आदींनी भावना व्यक्त केल्या.
भगवानगडावर १८ जून रोजी मुंडेंचा अस्थिकलश
गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश १८ जून रोजी दर्शनासाठी भगवानगडावर ठेवण्यात येणार आहे. या वेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती गडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज यांनी दिली. मंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम ते गडावर आले. त्यांच्या प्रयत्नातून गडाचा विकास झाला, गडाची ख्याती सर्वदूर पोहोचली. केंद्रात संधी मिळाल्यामुळे गडाचा आणखी विकास करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे गडाच्या पंचक्रोशीतील नागरिकांना त्यांच्या अस्थीचे दर्शन मिळावे यासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहे.