मराठी चित्रपट निर्मात्या, दिग्ददर्शक, अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या निधनाने कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीस बुधवारी धक्का बसला. त्यांनी करवीरनगरीत केलेल्या चित्रपट, दूरदर्शन मालिका निर्मितीची आठवण कलाकारांना झाली. तर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका या नात्याने वयोवृध्द कलाकारांना मानधन मिळवून देण्याची कठीण कामगिरी पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली. महामंडळाच्या कार्यालयात त्यांना महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके, सदानंद सूर्यवंशी, बाळासो बारामती, इम्तिहाज बारगीर, सतीश बिडकर या संचालकांच्या उपस्थितीत श्रध्दांजली वाहण्यात आली.
तळवलकरांच्या कोल्हापुरातील चित्रपट निर्मितीला उजाळा देताना भुरके म्हणाले,की त्यांनी येथे ‘सवत माझी लाडकी’, ‘चौकट राजा’ या चित्रपटांची निर्मिती केली. स्थानिक कलाकार, तंत्रज्ञान यांना नेहमी संधी दिली. निर्माता होणे अवघड असते, आयुष्याला आव्हान देण्यातला हा प्रकार असतानाही त्या तडफदार स्वभावामुळे अनेक संकटांवर मात करू शकल्या. महामंडळामध्ये त्या अभिनेत्री गटातून संचालिका म्हणून निवडून आल्या होत्या. महामंडळाच्या कार्यात त्या उत्साहाने सहभागी होत असत. वयोवृध्द कलाकारांना त्यांनी मानधन मिळवून देणेसाठी केलेल्या प्रयत्नांना कधीही विसरता येणार नाही. त्यांना एनएफडीसीच्यावतीने महात्मा गांधी कलाकार मानधन दिले जात होते. कोल्हापुरातील कलाकारांना दोन वर्ष मानधन बंद झाले होते. वयोवृध्द, विकलांग कलाकारांना मुंबईला जाऊन कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नव्हते, ही बाब स्मिताताईंना समजली. त्या वेळी त्या एनएफडीसीच्या समितीवर काम करीत होत्या. त्यांनी तेथील पथक कोल्हापुरात आणून वयोवृध्द कलाकारांना मानधन मिळवून दिले. त्यांची ही कृती वृध्द कलाकारांना आयुष्याच्या संध्याकाळी मोलाची मदत ठरली.
स्मिताताईंसमवेत ‘गडबड घोटाळा’, ‘तू सौभाग्यवती हो’ या चित्रपटात अभिनय केलेले ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी चित्रपट नाटयसृष्टीतील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्याचे नमूद केले. चित्रपट महामंडळ व नाटय परिषदेचे संचालक म्हणून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय होते. त्यांनी कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडियोमध्ये ‘राऊ’ ही ऐतिहासिक मालिका तयार केली. त्यामध्ये मी शाहू महाराजांची भूमिका केली होती. आíथक संकट असतानाही येणाऱ्या प्रसंगांना त्या हसतमुखाने तोंड देत असत. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकांवेळी कोल्हापुरात त्यांचा मुक्काम ठरलेला असे. या काळात कामगारांच्या भेटी घेऊन त्यांची समस्या समजावून घेत असत.