पेरणीनंतर पाऊस बरसलाच नाही. पाण्याअभावी शेती संकटात सापडली. प्यायच्या पाण्याचीही मारामार. परंतु भीषण दुष्काळाशी कणखरपणे दोन हात करून उपलब्ध पाणी नि नवीन तंत्रज्ञानाची साथ याच्या बळावर जिरायत व कोरडवाहू जमिनीतून रब्बी ज्वारीचे दर्जेदार पीक, तसेच कसदार कडब्याचे उत्पादन घेण्याची किमया महाराष्ट्राचे ‘रब्बी ज्वारीचे कोठार’ अशी ओळख असलेल्या तीन जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांनी करून दाखविली. पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्य़ातील तब्बल साडेअकरा हजार शेतकऱ्यांनी गेली ४ वर्षे रब्बी ज्वारीचे घेतलेले हे यशस्वी उत्पादन सततच्या दुष्काळी व पर्जन्यछायेच्या प्रदेशातील पारंपरिक ज्वारी पिकावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी पर्वणीच ठरावे.
अन्न सुरक्षा अभियानात आता रब्बी ज्वारीचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीचे पीक घेतले जाते. यातील २० लाख हेक्टर क्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील असून, यातील तब्बल १६ लाख हेक्टर क्षेत्र वरील ३ जिल्ह्य़ांतले आहे. यंदा मात्र या तिन्ही जिल्ह्य़ांना दुष्काळाचा फटका बसला. नगर जिल्ह्य़ात ४३९ मिमी, सोलापूर ३६३ व पुणे जिल्ह्य़ातही सरासरीच्या तुलनेने कमी पर्जन्यमान झाले. परिणामी दुष्काळाची तीव्रता निर्माण झाली. परंतु या दुष्काळानेच रब्बी ज्वारीची शाश्वत उत्पादकता, पिकाचा दर्जा नि खात्रीचे अर्थकारण या तिन्ही बाबतीत शेतकऱ्यांना आशेचा किरण दाखविला. दुष्काळाच्या कठीण पर्वातच नवीन तंत्रज्ञानाची नेमकी परिणामकारकता या जिल्ह्य़ातल्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली नि वर्षांनुवर्षे ज्वारीचे पीक घेणाऱ्या, परंतु गेली अनेक वर्षे पावसाअभावी जेरीस आलेल्या शेतकऱ्यांसमोर आपल्या अनुभवाचे भांडार खुले केले.
पंचसूत्री तंत्राने हे यश साध्य झाले. मूलस्थानी पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या प्रतवारीनुसार वाणाचा वापर (फुले अनुराधा, सुचित्रा, वसुधा, रेवती), १८ इंची पद्धतीने पेरणी, पेरणीच्या वेळीच रासायनिक खताची मात्रा व खोडमाशी-मावा नियंत्रण हे ते सूत्र.
या सूत्राचा अवलंब केल्याने जिरायत-कोरडवाहू जमिनीतही खात्रीने ५० ते १०० टक्के उत्पादनवाढ मिळू शकली. या १५ गावांमधील ११ हजार ५०० शेतकऱ्यांनी गेली ३ वर्षे चार-साडेचार हजार एकर जमिनीत हे उत्पादन घेतले. मागील वर्षी हेक्टरी ७९० किलो ज्वारी उत्पादन झाले. यंदा ते कमी होऊन हेक्टरी ५५० ते ६०० किलो मिळण्याची शक्यता आहे.
धान्य उत्पादनात ४० टक्के व कडबा उत्पादनात ३५ टक्के वाढ, येत्या काळात २ हजार क्विंटल (२० हजार हेक्टरला पुरणारे) नवीन खात्रीचे बियाणे ही ४ वर्षांतील उपलब्धी आहे, असे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. शरद गडाख यांनी सांगितले. पूर्वी जिरायत-कोरडवाहू जमिनीत एकरी २-३ क्विंटल ज्वारी मिळत होती. आता मात्र नव्या तंत्रामुळे एकरी ८-१० क्विंटल सहज मिळत आहेत, असे इसळक (तालुका नगर) गावचे शेतकरी भाऊराव गायकवाड, राजू सय्यद, खपके आदी शेतकऱ्यांनी सांगितले.

एक क्विंटल उत्पादन वाढले तरी मिळतील ६५० कोटी!
* ज्वारीचा भाव क्विंटलला २ हजार, कडबा ४ हजार रुपये.
* नव्या तंत्राने उत्पादन हेक्टरी २०-२५ क्विंटल.
* जिरायत जमिनीत ज्वारीतून ४० हजार व कडब्याचे २० हजार उत्पन्न.
* सुधारित बियाणे पेरल्यास हेक्टरी किमान १-२ क्विंटल उत्पादनवाढ शक्य.
* मशागत, पेरणी, देखभाल, काढणीसह नवीन तंत्रज्ञान वापरल्यास हेक्टरी २५-३० क्विंटल उत्पादन.
*  पेरणीनंतर पाऊस न होताही केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर दर्जेदार उत्पादनाची, कडब्याची खात्री.