सावंतवाडी रोड टर्मिनस येथे कोकण बजेट हॉटेल उभारले जाणार आहे. या ३० रूम्सच्या हॉटेल निविदांना यापूर्वी प्रतिसाद मिळाला नसला तरी आता प्रत्यक्षात अन्य कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच कॅटरिंग आणि पर्यटनसाठी सुमारे १०० लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी ग्वाही आयआरसीटीसीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अरुण कुमार मनोचा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी रेल्वेचे समूह महाप्रबंधक अरविंद मालखंडे उपस्थित होते. आयआरसीटीसीच्या माध्यमातून कौशल्यविकास कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कॅटरिंग आणि पर्यटनविषयी कौशल्यविकास कार्यक्रमात १०० जणांना प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी टप्प्याटप्प्याने २५ जणांची बॅच घेण्यात येईल, असे मनोचा म्हणाले. महिला बटत गटाच्या माध्यमातून नाबार्ड व लुपिन यांच्या समन्वयातून २ ऑक्टोबरला ई-कॅटरिंग सुविधा दिली जाईल. या सेवेतून मालवणी खाद्य व मालवणी जेवण दिले जाईल, असे अरुण कुमार मनोचा म्हणाले. कोकण बजेट हॉटेलसाठी खासगी कंपनीने गुंतवणूक करावी. त्यासाठी आयआरसीटीसी आर्थिक सहकार्य करणार आहे. खासगी कंपनी या ठिकाणी आल्यास पायाभूत सुविधा देण्यास कोकण रेल्वे निश्चितच पुढाकार घेईल, असेही मनोचा म्हणाले.