कॉपी, पेपरफुटी, केंद्रातील गोंधळ आणि शिक्षकांची असहकाराची धमकी

वाढलेल्या विद्यार्थी संख्येमुळे मुंबईसह राज्यभरात परीक्षा केंद्रांच्या वाटपातील गोंधळ, पहिल्याच दिवशी लातूर येथे झालेला सामूहिक कॉपीचा प्रकार, बुलढाणा येथे प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार आणि भरीस भर म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या संघटनेने उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी पुकारलेला असहकार, अशा अडथळ्यांच्या शर्यतीत राज्यात मंगळवारी बारावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला.

लातूरमधला कॉपीपॅटर्न

लातूर :  लातूर जिल्हय़ातील ३५ हजार ५३६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. पहिल्याच दिवशी इंग्रजीची परीक्षा सुरू झाल्यानंतर निलंगा तालुक्यात शिवणी कोतल येथील श्रामगीर माध्यमिक विद्यालयातून प्रश्नपत्रिका परीक्षा खोलीच्या बाहेर आली अन् परीक्षार्थीच्या नातलगांनी कार्बन पेपरचा वापर करत परीक्षार्थीना उत्तरे लिहून पाठवण्यास सुरुवात केली. जिल्हय़ात ७८ परीक्षा केंद्रांवर बैठी पथके तनात करण्यात आली आहेत. याशिवाय भरारी पथकेही तनात करण्यात आल्याचे विभागीय परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव गणपत मोरे यांनी जाहीर केले होते. ही पथके असतानाही शिवणी कोतल परीक्षा केंद्रातून अध्र्या तासातच प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली व खुलेआम गैरप्रकार कसे काय सुरू राहिले, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा प्रकार समोर येऊनही राज्य मंडळाकडे मात्र लातूर विभागात एकच गैरप्रकार घडल्याची नोंद करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी राज्यभरात ४२ गैरप्रकार घडल्याची नोंद झाली असून सर्वाधिक प्रमाण अमरावती विभागात (१६) आहे. त्याचप्रमाणे नाशिक (११), पुणे (१०), नागपूर (३), कोल्हापूर (१) असे गैरप्रकार नोंदवण्यात आले आहेत.  मुंबई, औरंगाबाद आणि कोकण विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही.

खामगावात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय

अकोला : बारावीच्या पहिल्याच दिवशी प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या चार मिनिटात ही प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाली होती. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता. दोन वर्षांपासून परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे आधी परीक्षार्थीना प्रश्नपत्रिका देण्यात येते. अकरा वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यावर अवघ्या चार मिनिटात इंग्रजीची प्रश्नपत्रिका व्हॉट्स अ‍ॅपवर फिरू लागली. सर्व उपाययोजना करूनही ही प्रश्नपत्रिका व्हायरल कशी झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे राज्य मंडळाचे म्हणणे आहे.

केंद्र वाटपात गोंधळ

या वर्षी वाढलेल्या विद्यार्थी संख्येमुळे अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रांच्या वाटपात गोंधळ झाल्याचे दिसत होते. त्याचे पडसाद बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान मुंबई आणि पुण्यातील काही केंद्रांवर उमटले. अनेक केंद्रांवर बैठक क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी देण्यात आले. अशा वेळी या केंद्रांनी उपकेंद्र घेऊन विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करणे अपेक्षित असते. मात्र काही केंद्रांनी उपकेंद्र घेतले नाही, तर काहींनी उपकेंद्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र सापडण्यासाठी उशीर झाला. विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली असली तरी पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्र शोधण्यासाठी धावाधाव करावी लागली.

मुंबईत यंदा २० हजारांनी वाढलेल्या बारावीच्या परीक्षार्थीकरीता परीक्षा केंद्र शोधता शोधता मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ आले. मुंबईत सुमारे १० ठिकाणी परीक्षा केंद्र असलेल्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी देण्यात आले होते. या शाळा-महाविद्यालयांनी मंडळाने केलेल्या सूचनेनुसार आपल्या परिसरातील शाळा-महाविद्यालयांशी संपर्क साधून अतिरिक्त विद्यार्थ्यांची परीक्षेपुरती बसण्याची सोय केली. बहुतेक केंद्रांवर याबाबत सूचना फलक लावण्यात आले होते. मात्र, दादरच्या डिसिल्व्हा हायस्कूलमधील परीक्षार्थीना याची माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. येथील २०० अतिरिक्त विद्यार्थ्यांची बसण्याची सोय हायस्कूलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नाबर गुरुजी शाळेत करण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार मालाड येथील मित्तल हायस्कूलमध्ये घडला, पण येथेही अतिरिक्त विद्यार्थ्यांची सोय जवळच्या सीजीएस मिशन हायस्कूलमध्ये करून देऊन त्यांचा प्रश्न मिटविण्यात आला. या बाबत मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोंधळाबाबत आपल्याकडे काहीच माहिती न आल्याचे सांगितले. ‘यंदा विद्यार्थी जास्त असल्याने परीक्षा केंद्र शोधताना खूप अडचणी आल्या. मात्र यंदा आम्ही जवळपास १५० केंद्रे वाढविली होती. मुंबईत बारावीची तब्बल ५५७ केंद्रे असून ही संख्या कुठल्याही विभागीय मंडळापेक्षा अधिक आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. पुण्यातही चार ते पाच परीक्षा केंद्रांवर उपकेंद्राची माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. मात्र, ही पर्यायी परीक्षा केंद्रे जवळच असल्याने परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ती गाठता आली आणि परीक्षा वेळेत देता आली. या वर्षी १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यात परीक्षा देणारे १ लाख १६ हजार ८९८ विद्यार्थी वाढले असून २ हजार ७१० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येत आहे.

..तर रोज एकच उत्तरपत्रिका तपासणार

परीक्षेच्या नियमनातील गोंधळ पहिल्याच दिवशी समोर आले असतानाच उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे आव्हानही राज्य मंडळासमोर उभे राहणार असल्याचे दिसते आहे. परीक्षांच्या तोंडावर आंदोलनांचाही मोसम सुरू झाला असून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने असहकार आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. ‘महासंघाच्या मागण्यांबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी मंगळवारी चर्चा झाली असून मागण्या ४ मार्चपर्यंत मान्य न झाल्यास शिक्षक रोज एकच उत्तरपत्रिका तपासतील,’ असे महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. ऑनलाइन संच मान्यतेतील त्रुटी दूर कराव्यात, २०१२-१३ पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून मान्यता द्यावी, माहिती तंत्रज्ञान विषय अनुदानित करावा, शिक्षण आयुक्तपद रद्द करावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, रिक्त पदे भरण्यात यावीत, जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी अशा प्रकारच्या २४ मागण्या संघटनेने केल्या आहेत.

लातूर येथील मास कॉपीच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज लातूर विभागात एक विद्यार्थी कॉपी करताना सापडल्यामुळे त्याची नोंद करण्यात आली आहे. मास कॉपीच्या प्रकाराबाबत अंतिम अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेत तथ्य असल्याचे दिसत नाही. त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रांच्या वाटपात किंवा परीक्षा केंद्रांना विद्यार्थी देण्याबाबत कोणत्याही प्रकारे गोंधळ झालेला नाही. या वर्षी उपकेंद्र कमी करून मुख्य केंद्राचीच संख्या वाढवण्यात आली होती. परीक्षा केंद्र मिळण्यात अडचणी आल्याची कोणत्याही प्रकारची तक्रार राज्य मंडळाकडे आलेली नाही.

गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, राज्यमंडळ