नागपूरसह विदर्भात खाणी आणि औष्णिक वीज प्रकल्पांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने शेती, जलसाठे, पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याला प्रचंड प्रमाणात धोका निर्माण निर्माण झाला आहे. कोळसा उत्खनन करताना जास्तीत जास्त नफ्यासाठी हापापलेल्या कंपन्यांनी तब्बल ८०० फुटांपर्यंत खोदकाम केल्याने नागपूर जिल्ह्य़ातील २० किमीपर्यंतचे नैसर्गिक भूजलाचे स्रोत खाणींच्या दिशेने वळते झाल्याचे गंभीर दुष्टचक्र उघडकीस आले आहे. खाणींमुळे दर दिवशी लाखो गॅलन पाणी निष्कारण बाहेर फेकले जात असून नागपूर जिल्ह्य़ाचा मोठा परिसर दुष्काळग्रस्त होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
 विशेषत: नागपूर जिल्ह्य़ात वेस्टर्न कोल फिल्ड आणि मॉईलच्या खाणींमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्खननाचे काम सुरू असून त्यामुळे गावातील नद्या आणि विहिरीचे पाणी प्रदूषित होत आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या आहेत. भूजलाची पातळी बरीच खोली गेल्याने यंदाचा उन्हाळा निघणे कठीण होणार आहे. भविष्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आ वासून उभे ठाकले असताना प्रशासकीय पातळीवर याबाबत अद्यापही गंभीर दखल घेण्यात आलेली नाही.
एकटय़ा शिवसेनेने खाणींमुळे होत असलेल्या नुकसानीवर जोरदार आवाज उठवला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला मात्र कोणतीही जाणीव झाल्याचे चित्र जाणावत नाही. नागपूर जिल्ह्य़ात वेकोलि आणि मॉईलच्या असंख्य खाणींनी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण केल्या आहेत. शिवाय औष्णिक वीज प्रकल्पांमधील राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. निम्न दर्जाचा कोळसा आणि जुनाट धुरांडय़ांमुळे वातावरणाचे जीवघेणे प्रदूषण होत असून त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पर्यावरणवादी संस्था-संघटनांकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.
एकटय़ा नागपूर जिल्ह्य़ात वेकोलिच्या कन्हान, गोंडेगाव, टेकाडी, कांद्री, जुनी कामठी, सावनेर, खापरखेडा, सिल्लेवाडा, वलनी, पाटणसावंगी, उमरेड, मकरधोकडा या सर्वच भागात खाणी आहेत. कोळसा उत्खननासाठी स्थानिक विहिरी व नद्याच्या पाण्याच्या स्तरापेक्षा खूप खोलपर्यंत खोदकाम करून कोळसा उत्पादन केले जात असून त्यावर कोटय़वधीचा व्यवसाय केला जात आहे.
खाणींच्या उत्खनन प्रक्रियेमुळे नागपूर जिल्ह्य़ातील जमिनीचे तापमान वाढत असून त्याचा शेतीपिकांवर दुष्परिणाम झाला आहे. दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याने आसपासच्या गावांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहे. या सर्व भागात जमिनीखालील पाणी कोळसा उत्खननातून उपसून नदी नाल्यात फेकण्याचे गैरकार्य सर्रासपणे सुरू आहे. यामुळे वातावरणात बदल झाला आहे. जमिनीखाली जनतेच्या हक्काचे असलेले पाणी उद्योगांसाठी उपसून बेकामी फेकून दिले जात असल्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले आहे.
नागपूर जिल्हयात १३ खाणी असून भूजल पातळी सर्वसाधारणपणे १८० ते २०० फुटापर्यंत होती, परंतु कोळसा उत्खनन कार्य जमिनीत १५० मीटपर्यंत करण्यात आले. अनेक ठिकाणी तर ८०० फुटापर्यंत खोदकाम झालेले आहे. परिणामी खाणी २० किमी पर्यंत जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत खदानीत वळते झाले असून हे पाणी गावकऱ्यांच्या मालकीचे आहे. ते पाणी पंपाद्वारे १८ तास सतत नाल्यातून फेकण्याचे काम सर्रासपणे सुरू आहे.

वेस्टर्न कोल फिल्डला सीएसआर फंडातून मोठय़ा प्रमाणात निधी येत असून हा निधी वृक्षारोपण, पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारून लगतच्या सर्व गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीला पुरवठा करणे, उर्वरित पाणी विहिरीत, तलावात, शेततळे, नाले, बांधारे बांधून पाणी जमिनीतच जिरविण्साठी खर्च केला पाहिजे मात्र गेल्या अनेक वर्षांत हा निधी दुसऱ्या कामासाठी खर्च केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते प्रकाश जाधव यांनी केला आहे. पाण्याचे नियोजन करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून मॉईलच्या मॅंगनीजच्या खाणीमुळे नागपूर जिल्ह्य़ाकील पाचगाव भागात नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या सर्व उद्योगामुळे जमिनीतील दर दिवशी लाखो गॅलन पाणी फेकल्या जात असल्याने जमिनीचा पाण्याचा स्तर खूप खाली गेला आहे.