गोव्यापाठोपाठ आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांनी पर्यटकांना भुरळ पाडलीय. दिवाळीच्या सुटीसाठी पर्यटकांनी रायगडच्या किनाऱ्यांवर गर्दी केली आहे.
नारळी-पोफळीच्या बागा, रुपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणाऱ्या लाटा यामुळे रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांचे फेव्हरिट डेस्टिनेशन ठरले आहे. बच्चेकंपनीला असलेली दिवाळीची सुटी आणि कार्यालयांनाही सलग सुटी आल्याने मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर रायगडातील या किनाऱ्यांकडे पर्यटकांची पावले वळली आहेत. गेल्या दोन दिवसांत अलिबाग, काशिद, मुरुड, दिवेआगर, हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर २५ हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट दिलीय. इथल्या समुद्रात मनसोक्त डुंबण्याबरोबरच वेगवेगळ्या वॉटरस्पोर्टस्चा आनंद पर्यटक घेत आहेत. घोडा आणि उंटांच्या सवारीमुळे बच्चेकंपनी, तर पॅरासेलिंग एटीव्ही राइड्स, जायंटबॉलसारख्या साहसी खेळांची रेलचेल यामुळे बडी मंडळीही खूश आहे. इथून पाय निघत नाही असे पर्यटक सांगतात. दिवाळी सुटीपासून आता पर्यटनाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी आतुर आहेत.
पर्यटकांच्या वर्दळीने किनारपट्टी गजबजली आहे. त्यामुळे चांगला रोजगार उपलब्ध झाला असून व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मोठय़ा हॉटेल्सबरोबरच स्थानिकांनी घरगुती स्वरूपात केलेल्या निवासाचीही बुकिंग फुल झाले आहे. मिनी गोवा म्हणून नावारूपाला आलेल्या रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची ही रेलचेल नवीन वर्षांच्या स्वागतापर्यंत अशीच कायम राहणार आहे.
रायगडच्या किनारपट्टीबरोबरच गडकिल्लेदेखील पर्यटकांच्या आगमनाने गजबजले आहेत. छत्रपतींची राजधानी असलेल्या किल्ले रायगडला मागील काही दिवसांत हजारो पर्यटकांनी भेट दिली. याशिवाय अष्टविनायकांपकी महडचा विनायक आणि पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठीही लांबलचक रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.