तीन महिलांचा बळी
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सानगडी, दिघोरी, बोंडगावदेवी या जंगल परिसरात गेल्या १५ दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू असून गावक ऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नरभक्षक वाघाने आतापर्यंत तीन महिलांचा बळी घेतला आहे. दहशतीमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सायंकाळपूर्वीच विरळ होऊ लागली आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप यश आलेले नाही. वाघाला पकडण्यासाठी ठिकठिकाणी िपजरे लावण्यात आले आहेत. असे असताना आज पुन्हा वाघाने एका शेळीची शिकार केली. नवेगावबांध वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या भिवखिडकीत २७ डिसेंबरला परिसरातील गुठरी येथील मीराबाई बाहेकार ही महिला सकाळी शेतात काम करण्याकरिता गेली असता दुपारी १२ ते १ च्या सुमारास वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. गेल्या १५ डिसेंबर रोजी याच नरभक्षक वाघाने भंडारा जिल्ह्य़ातील लाखांदूर तालुक्यातील मानेगाव येथील छाया देशपांडे तसेच २४ डिसेंबर रोजी मुक्ता गणवीर या महिला सरपणासाठी जंगलात गेल्या असताना त्यांच्यावर हल्ला केला होता. या घटनेतही मुक्ताबाईचा बळी गेला होता.  नवेगाव वनक्षेत्र हा परिसर प्रचंड मोठा आहे. भिवखिडकी, दिघोरी, सानगडी, बोंडगावदेवी या परिसरातील जंगल परस्परांना जोडलेले असल्याने हा नरभक्षक वाघ याच जंगलात फिरत आहे. नरभक्षक वाघाने रविवारी श्रावण नेवारे (रा. सालई) यांच्या घरात बांधलेल्या शेळीचाही बळी घेतला. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी आज सकाळपासूनच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पुन्हा कामाला लागले. वाघाला बेशुद्ध करण्यासाठी ट्रॅंक्विलायझर गन मारण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञांनासुद्धा पाचारण करण्यात आले आहे. ठिकठिकाणी िपजरे लावून पाळत ठेवली जात आहे. वनविभागाकडून वाघ जेरबंद झाला आहे, अशी माहिती मिळणार नाही तोपर्यंत तालुक्यात नागरिक सुटकेचा श्वास घेणार नाहीत, याची जाणीव असल्याने वन विभागानेही कसब पणाला लावले असल्याचे दिसून येत आहे